

डोंबिवली : माझ्या व्यवसायात वाचनाला फार महत्व आहे. कारण कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना मला वाचावे लागते. मग ते पुस्तक असो, स्क्रिप्ट असो, वा माणूस असो. त्या वाचनातून व्यक्तिरेखा साकारली जात असते. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात कार्य करा, पण त्यासाठी आधी वाचन महत्त्वाचे आहे. वाचन तुम्ही कसेही करू शकता. कोणत्याही माध्यमातून करू शकता. कोणत्याही प्रकारे करू शकता. फक्त काय वाचायचे आणि कसे वाचायचे हे वाचणाऱ्याला कळले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते अरूण नलावडे यांनी कल्याणात बोलताना केले.
अक्षरमंच सामाजिक-सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, इनरव्हील क्लब ऑफ कल्याण आणि बालक मंदिर संस्था यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या सलग 50 तास अखंड वाचन महायज्ञाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते अरूण नलावडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, असे ऐकले होते की पुराण काळात काही तरी कुणाला तरी प्राप्त व्हावे, मग ते राज्य असो, संपत्ती असो वा युद्ध जिंकणे असो, त्यासाठी यज्ञ केला जात असे. पण डॉ. योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून समाजाच्या व भावी पिढीच्या उन्नतीसाठी वाचनाचा यज्ञ आयोजित करण्यात आला हे खरोखरच खूप महान कार्य आहे. असा यज्ञ पुराणकाळात सुद्धा झाला नसेल, अशीही प्रशंसा अभिनेते नलावडे यांनी केली.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या प्रेरणा रायचूर यांनी वाचनाचे महत्त्व सांगून उपक्रमाचे कौतुक केले. अखंड वाचन यज्ञाचे उद्घाटन प्रसंगी बालक मंदिर संस्था व कॅप्टन रमाकांत ओक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनातून ग्रंथ दिंडी काढून करण्यात आले. ओक हायस्कूल शाळेचा अंध विद्यार्थी सुश्रुत कुलकर्णी, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. दिनेश मेहता आणि इनर व्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन प्रेरणा रायचूर यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून ग्रंथ दिंडीची सुरुवात करण्यात आली. कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झालेल्या ग्रंथ दिंडीची बालक मंदिर येथील जयवंत दळवी वाचननगरीत सांगता करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते डॉ. वीणा देव वाचन कट्टा आणि सुधाताई करमरकर वाचन कट्टा यांचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ओक स्कूलचा अंध विद्यार्थी सुश्रुत कुलकर्णी याने ब्रेलमधून वाचन करून नवी दृष्टी दिली. त्यानंतर मयुरेश गद्रे, डॉ. सुश्रुत वैद्य, नमिता भिडे, डॉ. योगेश जोशी यांनी वाचन करून उपक्रमाची सुरुवात केली.
मराठी वाचन संस्कृतातील महत्वाचा टप्पा असलेल्या दिवाळी अंकांच्या स्पर्धेतील भावार्थ (प्रसाद मिरासदार), चांगुलपणाची चळवळ (शुभांगी मुळे), व्ययम् (श्रीकांत बापट), हॅशटॅग (पुंडलिक पै) यांचा अक्षरगंध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लेखन आणि वाचन क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल डॉ. सुनीलकुमार सरनाईक. डॉ. दिनेश गुप्ता आणि डॉ. सुनील खर्डीकर यांचा अक्षरगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सदर उपक्रमाचे आयोजन अक्षरमंच प्रतिष्ठानचे हेमंत नेहते, इनर व्हील क्लब ऑफ कल्याणच्या डॉ. अर्चना सोमाणी, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे बिजू उन्निथन, डॉ. सुश्रुत वैद्य आणि नमिता भिडे यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुकन्या जोशी यांनी केले. बिजू उन्निथन यांनी आभार मानले.