डोंबिवली : बालदिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील श्रीसमर्थ कृपा स्पेशल नीड चिल्ड्रन स्कूलमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुले आणि विद्यार्थी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी मुलांनी नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. तर विविध स्पर्धांमध्येही मुले सहभागी झाली होती. तसेच बालदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्यानंतर केक कापून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोर विशेष बौद्धिक अक्षम असलेल्या मुलांची शाळा गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहे. या शाळेमध्ये मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास केला जातो. विविध प्रकारच्या शालेय क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी विविध सण देखिल साजरे केले जातात. प्रत्येक सणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले जाते. शैक्षणिक अभ्यासक्रमासह इतरही विषयांचे ज्ञान दिले जाते. शैक्षणिक सहल, स्वयंपाक कौशल्य, मनोरंजनात्मक खेळ, क्रीडा स्पर्धा, पणती-दिव्यांसह अगरबत्यांचे स्टॉल लावून खरेदी-विक्रीचे ज्ञान दिले जाते. शाळेचे मुख्याध्यापक विनोद सूर्यराव यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री जाधव, सुप्रिया देशमुख, स्वाती विचारे, ज्योत्स्ना मोरे या 4 प्रशिक्षित शिक्षिका आणि सुनीता जयस्वाल मदतनीस कार्यरत आहेत. मुलांना जास्तीत जास्त उत्तम दर्जाचे शिक्षण कसे देता येईल याचा प्रयत्न केला जातो. थेरपीची गरज असल्यामुळे सायकॉलॉजिस्ट, फिजिओथेरपीस्ट, ऑकॅशनल थेरपीस्टकडून मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. शाळेत 34 मुले असून त्यांचा बौद्धिक विकास करण्याकडे लक्ष केंद्रित केले जाते असे मुख्याध्यापक विनोद सूर्यराव यांनी सांगितले.