

ठाणे : ठाणे पूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी नेहमीच शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याच परंपरेला पुढे नेत, या शाळेच्या माजी विद्यार्थ्याने एक अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आर्यन देवळेकर याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली आहे. त्याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल शाळेच्या वतीने शुक्रवारी (दि.21) रोजी त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
22 वर्षीय आर्यनने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेतल्या जाणार्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. या अभूतपूर्व यशामुळे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इतिहासात आर्यनने एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी संस्थेच्या वतीने विशेष सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले.
सन्मान समारंभ सोहळ्याला पी. ई. सोसायटी इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती यादव, हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक दादा कर्णवर, संस्थेच्या आजीव सभासद रेखा वाघ, तसेच आर्यनचे पालक हर्षद आणि मानसी देवळेकर उपस्थित होते.
यावेळी आर्यनच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांनी त्याच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी तो आदर्श ठरेल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. आर्यन देवळेकरच्या यशामुळे ठाणे शहरासह पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा सन्मान वाढला आहे. त्याच्या पुढील प्रवासासाठी संपूर्ण शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. त्याची जिद्द आणि कर्तृत्व येणार्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
22 वर्षीय आर्यनने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेतल्या जाणार्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्यानंतर त्याने चेन्नई येथे एक वर्षाचे कठोर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले आणि अखेर 8 मार्च रोजी भारतीय लष्कराच्या आसाम रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाला.