

ठाणे : शुभम साळुंके
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या मलंगगड भागातील नद्या,नाले आणि विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी आणि अन्नाच्या शोधात वन्य जीव मानवी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात झाली आहे.
श्री मलंगगडाच्या पायथ्याच्या परिसरात हनुमान लंगूर जातीच्या वानराला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. हा वानर जखमी अवस्थेत एका जागेत ठाण मांडून बसला होता. या प्रकाराची माहिती वॉर संघटनेच्या सदस्यांना मिळताच त्यांनी बदलापूर वन विभागाच्या मदतीने जखमी वानराला रेस्क्यू करत उपचारासाठी दाखल केलं आहे. मात्र वाढता उन्हाचा तडाखा लक्षात घेता वन्य जीवांसाठी पाणवठे तयार करण्याची गरज निर्माण झाल्याचे चित्र वन्य जीवांच्या हालचालीवरून दिसू लागले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात सातत्याने वन्य जीवांची वर्दळ दिसून येत असते. या परिसराला माथेरानचा डोंगर लागून असल्याने सातत्याने वन्य जीव या परिसरात येत असतात. या भागात बिबट्या,रान डुक्कर,ससे,हरण आधी प्राण्यांची वर्दळ असते. पाणी आणि भक्ष्याच्या शोधात हे वन्यजीव मानवी वस्तीत प्रवेश करत करतात. मात्र त्यांचा हा प्रवेश त्यांच्याच जीवावर बेतू लागला आहे. हनुमान लंगूर जातीचा माकड जखमी अवस्थेत मिळाल्यानंतर वन विभागाने या प्रकाराची चौकशी देखील केली आहे. या चौकशीत म्हटलं आहे कि,अपघाताचे नेमके कारण माहित करण्यासाठी योग्य तो तपास केल्यानंतर असे निदर्शनास आले कि एक व्यक्ती तेथे गाडी लावून माकडांना खाऊ घालत होता. त्यामुळे तेथे माकडांची गर्दी झाली होती तेव्हा दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाडीची धडक त्यापैकी एका माकडाला लागली असावी असा वन विभागाच्या तपासात घटनाक्रम समोर आला आहे.
अत्यंत गंभीर जखमी असलेल्या वानराला रेस्क्यू करण्याचे मोठे आव्हान होते. त्यानंतर माहिती मिळताच बचाव करण्यासाठी वॉर फॉउंडेशन चे प्राणी मित्र मंदार सावंत व विनायक पवार हे घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वानर गंभीर स्वरूपात जखमी असल्याचे निदर्शनास आलं होते. त्याला घटनास्थळापासून हलवण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. मात्र रुग्णवाहिका व साधनसामग्रीचा अभाव असल्याकारणाने कल्याण मधील पार्थ पाठारे व तन्मय माने हे शक्य तेवढं साहित्य घेऊन एका भाड्याच्या टेम्पोच्या साहाय्याने घटनास्थळी रवाना झाले होते. वन विभाग आणि सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर त्या वानराचा बचाव करण्यात यश आलं आहे. या जखमी वानरावर काही दिवस उपचार केले जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.