.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
डोंबिवली : डोंबिवली जवळच्या ठाकुर्लीतील रिअल इस्टेट कंपनीच्या सभासदांनी कल्याणच्या ग्रामीण भागात असलेल्या खोणी गावातील एका जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून मुंबईतील एका व्यावसायिक आणि त्याच्या मित्राला विक्री केली. जमीन विक्रीच्या तडजोड व्यवहातून लोअर परेलमधील एका उच्चभ्रू गृहसंकुलातील सदनिका आपणास स्वस्तात घेऊन देतो असे सांगून रिअल इस्टेटच्या सभासदांनी दोन जणांची 10 कोटी 40 लाख रूपयांची फसवणूक केली आहे. 2021 ते 2023 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
मुंबईच्या कांदिवलीत राहणाऱ्या एका व्यावसायिकाने पाच दिवसांपूर्वी फसवणूक प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीवरून डोंबिवलीजवळच्या ठाकुर्लीतील एका रिअल इस्टेट कंपनीच्या चार सभासदांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकुर्लीतील रिअल इस्टेट कंपनीच्या सभासदांनी काटई-बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या खोणी गावठाण हद्दीतील एका जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे सन 2007 च्या मुद्रांक शुल्क दस्तऐवजावर तयार करण्यात आली. ही कागदपत्रे खूप जुनी असल्याचे मुंबईतील जमीन खरेदीदारांना दाखविण्यात आले. या जमिनीचा मूळ मालक रिअल इस्टेटमधील एकही सभासद नसताना, ते या जमिनीचे मूळ मालक असल्याचे दस्तऐवजावर दाखविण्यात आले. ही जमीन रिअल इस्टेच्या चार आणि इतर सभासदांनी मुंबईतील कांदिवली भागात राहणाऱ्या एक व्यावसायिक आणि त्याच्या मित्राला विक्री केली.
शिवाय या जमिनीच्या तडजोड व्यवहारातून या जमिनीबरोबर रिअल इस्टेटच्या सभासदांनी व्यावसायिकांना आम्ही तुम्हाला लोअर परेल येथील एका उच्चभ्रू वसाहतीच्या गृहसंकुलात स्वस्त दरात सदनिका घेऊन देतो, असे अमिष दाखविले. या अमिषाच्या माध्यमातून सदनिकेच्या नावे रिअल इस्टेटच्या सभासदांनी त्यांच्या ठाकुर्लीतील कार्यालयात एका व्यावसायिकाकडून 6 कोटी 90 लाख आणि त्यांच्या मित्राकडून 3 कोटी 50 लाख रूपये उकळले. तर काही रक्कम अन्य सभासदांच्या बँक खात्यांवर आरटीजीएसच्या माध्यमातून भरणा करून घेतली. तक्रारदारांना जेव्हा जमीन व्यवहार आणि सदनिका व्यवहाराच्या माध्यमातून रिअल इस्टेटच्या सभासदांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत पाटील या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत.
Meta Keywords: land fraud Mumbai, property scam, Mumbai real estate fraud, 10.40 crore scam, land sale fraud, Mumbai crime news, property dispute, real estate fraud case
4o