

ठाणे : अति प्राचीन सिद्धेश्वर मंदिराच्या उत्खननाच्या मुहूर्तालाच सापडलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अति प्राचीन ब्रम्हमुर्ती नंतर ठाण्याच्या टेंभी नाक्यावर दिघेंच्या मठाजवळ एका इमारतीचे काम सुरू असताना काही प्राचीन दगडी अवशेष जमिनीबाहेर आल्याचे दिसत आहेत. तूर्त तरी हे अवशेष प्लॉट मध्येच असून ते चोरीला जाण्याचे वा जमिनीत भरणी करण्याचे संभव असल्याची तक्रार कैलाश म्हापदी यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत तातडीने पुरातत्त्व विभागाच्या संचालकांना तपासणीच्या सूचना दिल्या आहेत.
बाराशे वर्षाची साक्ष सांगणारे ठाण्याचे कोपीनेश्वर मंदिर पाहिले तर महागिरी, चरई, खारकर आळी, चेंदणी कोळीवाडा, हिराकोट आणि दगडी शाळा, आताचे कोर्ट म्हणजे ऐतिहासिक काँग्रेस हाऊस, बीवलकर वाडा, जोशी वाडा ते ठाणे तुरुंगातला भुयारी रस्ता या सार्या इतिहासाच्या खुणा ठाण्याच्या शिरपेचात होत्या. आता त्या जवळजवळ नष्ट झाल्या आहेत. या परिसरात जेव्हा जेव्हा खोदकाम होतं, तेव्हा तेव्हा जमिनीतून काही ना काही पुरातत्व भाग बाहेर येतात. मात्र या सगळ्या गोष्टी एक तर चोरीला तरी जातात किंवा ते भरणीसाठी वापरले जातात.
सिद्धेश्वर तलावाची भली मोठी तटबंदी आणि किनार्यावरती अस्ताव्यस्त पडलेले शिलालेख, मुर्त्या या अशाच भरणीसाठी वापरल्या गेलेल्याचा ऐतिहासिक पुरावा आहे. या पार्श्वभूमीवर टेंभी नाक्यावरती तूर्त तरी बाहेर काढून ठेवलेले हे दगड प्रथमदर्शनी पाहिले तर ते एखाद्या प्राचीन जमिनीतल्या मंदिराचे अवशेष असावे, असे प्राच्य विद्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. ते शास्त्रशुद्ध पद्धतीने अर्कॉलॉजीस्टच्या उपस्थितीत तपासून घ्यायला हवे, अशी मागणी इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांनी केली आहे.
ठाण्याच्या ह्या ऐतिहासिक पट्ट्यात यापूर्वी देखील अनेक दगडी कोरीव खुणा सहज केलेल्या उत्खननात आढळून आले आहेत. आपलं इमारत बांधकाम थांबून जाईल या एकाच भीतीखातर या खुणा अनेकदा लपवल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जे सिद्धेश्वर तलावाचं झालं, ते टेंभी नाक्यावर होऊ नये. किमान प्राथमिक तपासणी तरी या अवशेषांची व्हावी आणि त्यांची मांडणी उचित ठिकाणी संग्रहालयात व्हावी, अशी मागणी टेटविलकर यांनी केली आहे. जिल्हाधिकारी शिनगारे यांनी म्हापदी यांच्या माहितीनंतर पुरातत्त्व विभागाला तशी सूचना केली आहे.
1995 ते 2000 या काळात कासारवडवली, हिरानंदानी नाका, तुर्फेपाडा, सिद्धेश्वर तलाव, चरई, खारकर आळी या परिसरात अशा छोट्या-मोठ्या खुणा सापडल्या. त्यातील काही मुर्त्या लोकांनी श्रद्धेंनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना सुपूर्द केल्या. त्यांच्या मठात त्या आजही सुरक्षित असल्याचे दिसते. ब्रह्मदेवाची मूर्ती ही मात्र स्थानिकांच्या आग्रहामुळे स्वतः कासाट समाजाच्या राम मंदिरासमोर सिद्धेश्वर तलाव येथेच साध्या पद्धतीने जतन करून ठेवण्यात आली आहे. तर भिवंडीतील लोणाड येथे सापडलेलं शिलाहारांचं राजपत्र हे देखील सध्या एका कोनावड्यात पडल्याचे चित्र आहे.
लोणाडच्या मंदिराला चारी बाजूने अतिक्रमणांचा घेरा पडला असून आता टिचभर मंदिर शिल्लक राहिले आहे. कोपिनेश्वर मंदिर देखील जीर्ण अवस्थेत शेवटच्या घटका मोजत असून मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रकल्प देखील अद्यापी रखडलेलाच आहे. दरम्यानच्या काळात मंदिराचे सभामंडपाचे धोकादायक बांधकाम तोडण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या सहकार्याने ठाण्यात हजुरीमध्ये एक प्राच्यविद्या संग्रहालय देखील आहे. ठाण्यामध्ये कै. हरिभाऊ शेजवळ, कै. दाऊद दळवी, सदाशिव टेटविलकर अशी एकापेक्षा एक सरस अशा तीन पिढ्यांमधील प्राच्य विद्या संशोधक हे राज्यात प्रतिष्ठेची नावं म्हणून ओळखले जातात. मात्र तरीही ठाण्यातल्या पुरातत्व वस्तूंविषयी शासन, प्रशासन आणि जनतेमध्ये प्रबोधन व आवड असायला हवी. या इतिहासाच्या खुणा कुणी बाहेरच्या बाहेर नष्ट करू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.