Anand Paranjpe : माजी खासदार आनंद परांजपे यांचे शिवसेनेत स्वगृही पुनरागमन

संघटनात्मक कामासाठी झोकून देणार : आनंद परांजपे
Anand Paranjpe : माजी खासदार आनंद परांजपे यांचे शिवसेनेत स्वगृही पुनरागमन
Published on
Updated on

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत तब्बल १४ वर्षांनंतर शिवसेनेत स्वगृही पुनरागमन केले. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, आणखी काही नेतेही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आनंद परांजपे यांनी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, रविंद्र फाटक यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

आनंद परांजपे शिवसेनेत असताना त्यांचे आणि शिंदे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत काम केले. त्यांनी दोनदा लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यांना यश मिळाले नाही. दिवंगत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळी भूमिका घेतल्यानंतर परांजपे यांनी आव्हाड यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत काम सुरू केले. राज्य प्रवक्ते म्हणून त्यांनी पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडली. मात्र पक्षाकडून सातत्याने अन्याय होत असल्याची भावना त्यांच्यात होती. आमदारकीचे दिलेले आश्वासनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे ते नाराज होते. अखेर त्यांनी पुन्हा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, “आनंद परांजपे यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील कार्यकर्ते दररोज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे राज्यात पक्षाची ताकद वाढत आहे. सध्या राज्यात एसआयआरचे काम सुरू असून शिवसेनेने एक लाखांहून अधिक बीएलओ नियुक्त केले आहेत.”

पक्षप्रवेशानंतर आनंद परांजपे म्हणाले, “मला घरातूनच शिवसेनेचा वारसा मिळाला आहे. शिवसेनेकडून मला दोन वेळा खासदार होण्याची संधी मिळाली आणि त्यात एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान आहे. मी दुसऱ्या पक्षात असलो तरी माझ्यात शिवसेनेचाच डीएनए आहे.”

ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी ‘कॉमन मॅन’ म्हणून काम करत जनहिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन मी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेसाठी काम करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news