

डोंबिवली : कल्याण ग्रामीण मतदार संघातील आडीवली-ढोकळी पिसवली परिसरात राज्य शासनाच्या अमृत योजनेतून रस्त्याची कामे सुरु असून या परिसरातील तलावाचे सुशोभिकरण देखील सुरु करण्यात आले. तर रस्त्याच्या कडेने जाणारे गटारे, पाण्याच्या टाक्या आणि अमृत योजनेतून पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची कामे सुरु असून या कामाची आमदार राजेश मोरे यांनी पाहणी केली. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसह एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी या कामाचा वेग वाढवत 20 मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण करण्याच्या सूचना आमदार मोरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी दौऱ्यादरम्यान अपघातात जखमी झालेले आमदार राजेश मोरे यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर मतदार संघात तात्काळ कामाला लागल्याचे मंगळवारी दिसून आले. अमृत योजनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून कामे संथगतीने सुरु आहेत. या कामांसाठी जागा मिळत नसल्याचे कारण सांगून पाण्याच्या टाक्यांचे काम तर अत्यंत संथ गतीने सुरु आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची कामे देखील अतिशय संथगतिने सुरु असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या परिसरातील रस्त्यांची कामे देखील शासनाच्या विविध निधीतून सुरु आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर आडीवली-ढोकळी आणि पिसवली परिसराचे रुपडे पालटणार आहे. यामुळेच रस्ते, तलावांचे सुशोभिकरण, जलवाहिन्यांसह रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या गटारांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार राजेश मोरे यांनी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान रस्त्याच्या कामात महावितरणच्या ट्रान्सफार्मरचा अडथळा येत असल्याने हा ट्रान्सफार्मर रस्त्याच्या मागच्या बाजूला स्थलांतरीत करण्यासाठी संबधित जागा मालकाशी चर्चा करण्यात येईल. या जागेच्या बदल्यात अपेक्षित मोबदला महापालिकेकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील आमदार मोरे यांनी जागेच्या मालकाला दिले.