महावाचन उत्सव 2024: अमिताभ बच्चन करणार राज्यातील शाळांमध्ये वाचनाचा प्रचार
ठाणे : दिलीप शिंदे
डिजिटल युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, वाचन चळवळ वाढावी याकरिता राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापन शाळांमध्ये २२ जुलै ते ३० ऑगस्ट पर्यन्त 'महावाचन उत्सव २०२४' हा उपक्रम 'रीड इंडिया सेलीब्रेशन' यांच्या सहकार्याने राज्य सरकारने राबविणार आहे. या उपक्रमाचे ब्रँड म्बेसेडर म्हणून सुपरस्टार अमिताभ बच्चन हे इयत्ता तिसरी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी वाढविण्यास प्रचार व प्रसार करणार आहेत.
राज्यात वाचन सांस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा मराठी साहित्य, मराठी सांस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देणे, विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्व विकासास चालना देणे, विद्यार्थ्याच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे याकरिता राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रमाचा शुभारंभ ५ डिसेम्बर २०२३ रोजी करण्यात आला. या उपक्रमामध्ये ६६ हजार शाळा व ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सदर उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात आला होता. याकरिता रीड इंडिया सेलिब्रेशन यांनी आर्थिक मोबदला घेतला नव्हता. या महावाचन उत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष असून राज्यातील शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी या इयत्तेतील सर्व विध्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता ३ री ते ५ वी, इयत्ता ६ वी ते ८ वी व इयत्ता ९ वी ते १२ वी अशा तीन इयत्ता निहाय वर्गवारी निश्चित करण्यात आली आहे. २२ जुलै ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम शाळांमध्ये राबविला जाणार आहे. त्याकरिता सरकारने ८ कोटी ७५ लाखांची भरीव तरतूद करून वाचन संस्कृतीला प्रोत्सहन देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

