KDMC women march : महापालिका कार्यालयावर पाण्यासाठी महिलांचे आंदोलन

शेकडो महिलांचा केडीएमसीला घेराव; तीन महिन्यांपासून रहिवासी पाणीटंचाईने त्रस्त
KDMC women march
महापालिका कार्यालयावर पाण्यासाठी महिलांचे आंदोलनpudhari photo
Published on
Updated on

सापाड : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील आंबिवलीजवळील नेपच्यून रहिवाशी वसाहतीत गेल्या तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त झालेल्या शेकडो महिलांनी केडीएमसी अ प्रभाग क्षेत्रावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला घेराव घातला. हातात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, बादल्या आणि हंडे घेऊन आलेल्या महिलांनी ‘पाणी द्या, जगू द्या’, ‘आम्हाला नियमित पाणी हवे’, ‘केवळ आश्वासने नकोत, पाणी द्या’ अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला.

नेपच्यून वसाहतीतील दहा हजारांहून अधिक नागरिक गेल्या तीन महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठ्याअभावी अत्यंत हालअपेष्टा सहन करत आहेत. पिण्याचे पाणी, स्वयंपाक, स्वच्छता आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नागरिकांना खासगी टँकर किंवा विकतचे पाणी घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.

KDMC women march
Water Scarcity Responsibility | पाणीटंचाई आणि आपण

मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की जोपर्यंत आमच्या संकुलासाठी नियमित पुरेसा पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही. वारंवार निवेदने देऊनही प्रशासन फक्त आश्वासने देत आहे. आता आम्हाला कृती हवी आहे. नेपच्यून वसाहतीत गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत अनियमित पाणीपुरवठा होत आहे.

अनेक वेळा दोन-दोन, तीन-तीन दिवस नळाला पाणी येत नाही. काही वेळा अत्यल्प दाबाने काही मिनिटांसाठी पाणी येते, मात्र ते संपूर्ण इमारतीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे महिलांना पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पाण्याच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. घरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून, महिलांवर पाणी साठवण्याची आणि विकत आणण्याची अतिरिक्त जबाबदारी पडली आहे.

मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अनेक महिलांनी सांगितले की, दररोज पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. याशिवाय टँकर मागविण्यासाठी हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. महागाईच्या काळात हा खर्च परवडत नसल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. आमच्या उत्पन्नाचा मोठा भाग आता पाण्यावर खर्च होत आहे.

KDMC women march
Pune Water Crisis: पुण्यात पाणीकपातीचा फटका; टँकरवर अवलंबून सोसायट्यांचे अर्थकारण कोलमडले

मुलांच्या शिक्षणाचा, घरखर्चाचा आणि इतर आवश्यक गरजांचा पैसा पाण्यासाठी खर्च करावा लागत आहे. सततच्या पाणीटंचाईमुळे अनेक कुटुंबांनी नेपच्यून वसाहतीतील घरे तात्पुरती रिकामी करून इतर ठिकाणी राहण्यास सुरुवात केली आहे.

नियमित पाणी नसल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, अनेक भाडेकरूंनी देखील घरे सोडल्याची तयारी केली आहे. नेपच्यून वसाहतीत फक्त पाणीटंचाईच नव्हे, तर स्वच्छतेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नियमित पाणी नसल्याने परिसरातील स्वच्छता राखणे कठीण झाले असून अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करण्यात आला.

तीन महिने झाले, पण आमच्या भागात नियमित पाणी नाही. रोज विकत पाणी घ्यावे लागते. घराचा सगळा खर्च विस्कळीत झाला आहे. जोपर्यंत नियमित पाणी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. प्रशासनाने तातडीने आमचा प्रश्न सोडवावा.

अनंता पाटील, रहिवासी

पावसाने सतत पाच दिवस सात ठाणे जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रात हाकार माजवला होता या पाच दिवसात मोहिले प्रकल्पामध्ये पाणी घुसून प्रकल्प भोवती चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता तर याच दरम्यान मोहिनी उत्कचन प्रकल्पावरून शहरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पुराच्या पाण्यामुळे फुटली. सततच्या पावसात या पाईपलाईन जोडण्याचे काम आमच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर केले 48 तासात हे काम पूर्ण करून शहराला पाणीपुरवठा मिळेल पर्यंत अजून दोन दिवस गेले त्यामुळे पाणी पुरवठा चे संकट जाणवले. आमचे प्रयत्न सुरू आहेत नेपच्यून वसाहतीत नियमित पाणी देण्यात येईल.

डावरे साहेब. कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news