

अंबरनाथ : एका भरधाव कार चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघे जण ठार झाले. कार चालकाने अक्षरश: चिरडल्याने दोघे बाईकस्वार जागीच ठार झाले, तर कार चालक लक्ष्मण शिंदे हे देखील मृत्यू पावले.
बाईकस्वारांपैकी शैलेश जाधव यांचा मृत्यू झाला आहे. ते अंबरनाथ नगरपालिकेच्या नगररचना विभागात काम करत होते. दुसरे नाव रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. अंबरनाथ शहराच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास पूर्व भागातून पश्चिम भागात जाणाऱ्या एका भरधाव कार चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला. ही धडक इतकी जबरदस्त होती की एक बाईकस्वार उड्डाणपुलावरून उडून ब्रिजच्या खाली पडला. हा सर्व प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
अंबरनाथमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठीच ही कार भरधाव वेगाने पश्चिम भागात जात होती. मात्र, ही गाडी कुणाच्या प्रचार ताफ्यातली होती हे स्पष्ट झालेले नाही.
या अपघाताने अंबरनाथ शहरावर शोककळा पसरली आहे. उड्डाणपुलावर या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही अपघातग्रस्त वाहने पंचनामा करून हटवल्यानंतरच वाहतूक सुरळीत झाली.