

अंबरनाथ : ‘आपण न्यायालयाकडे केवळ कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नव्हे, तर जनतेच्या विश्वासास पात्र ठरणारी एक सजीव संस्था म्हणून पाहू.’ असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी केले. शनिवारी अंबरनाथच्या चिखलोली येथील नव्याने उभारलेल्या दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ’ अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल. वाढत्या लोकसंख्येमुळे अंबरनाथसारख्या ठिकाणी हे न्यायालय झाल्यामुळे न्यायदानाचे काम जलदगतीने होणार आहे. आधुनिक इमारतीच्या माध्यमातून न्याय आपल्या दारी ही संकल्पना साकार होण्यास देखील मदत होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अंबरनाथचे भूषण असलेल्या प्राचीन शिवमंदिराप्रमाणे हे न्यायमंदिर देखील शहराची एक नवीन ओळख होईल. या न्याय मंदिरात कायम सत्याचाच विजय होईल. राज्याला निष्पक्ष न्यायदानाची परंपरा आहे. आम्ही विविध उद्घाटने करतो. मात्र न्यायालयाचे उद्घाटन करणे ही एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.न्यायव्यवस्थेच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचे काम शासन करेल जेणेकरून नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होईल.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे, न्यायमूर्ती अद्वैत सेठना, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे श्रीनिवास अग्रवाल, तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अॅड.विठ्ठल कोंडे-देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.गजानन चव्हाण, उल्हासनगर तालुका बार डव्होकेट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड.संजय सोनवणे, आमदार बालाजी किणीकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार अमित पुरी, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, जिल्ह्यातील वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरीक उपस्थित होते.