

ठाणे : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत भाजपने अनेक वर्षांची सत्ता असलेल्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला. अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजश्री करंजुळे, तर बदलापुरात भाजपच्याच रुचिता घोरपडे विजयी झाल्या. राज्यातील हे लक्षवेधी सत्तांतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा झटका ठरले आहे.
एकनाथ शिंदे यांनी राज्यभर फिरून प्रचार केल्याने ठाण्याला लागून असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदांच्या निवडणुकीची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या दोन्ही नगरपरिषदा श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे याठिकाणी श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले असले, तरी नगराध्यक्षपदावर भाजपने बाजी मरली आहे. अंबरनाथ हा शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी सुरुंग लावला आहे. अंबरनाथमध्ये जो गोळीबार झाला, त्यामुळे मतदान फिरले असल्याची चर्चा येथे रंगू लागली आहे. शिवसेना शिंदे गट-भाजप युतीत फोडाफोडीचा वाद जो दिल्लीपर्यंत पोहोचला होता, त्याची सुरुवात अंबरनाथ येथून झाली होती. त्यामुळे अंबरनाथ नगरपरिषदेच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अंबरनाथ येथून शिवसेनेचे नगरसेवक भाजपने फोडले होते. ही निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली होती. तेथे भाजपच्या तेजश्री करंजुळे यांनी बाजी मारली.
भाजपचे यश डोळ्यांत भरण्याजोगे
अंबरनाथप्रमाणेच बदलापूर हाही ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा गड मानला जातो. त्यावर भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. असे असले तरी बदलापुरात शिंदेंच्या शिवसेनेचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदी भाजपच्या रुचिता घोरपडे विजयी झाल्या. विशेष म्हणजे, या ठिकाणी भाजपचे 22 नगरसेवक निवडून आले आहेत. हे यश लक्षणीय मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे येथे तीन नगरसेवक विजयी झाले. महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांचा सुपडासाफ झाला आहे.