

अंबरनाथ : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांसाठी विविध भागांमध्ये तब्बल 600 फीडिंग स्पॉट तयार करण्यात येणार असल्याची माहिती अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असा इशारा देखील अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.
अंबरनाथ शहरात भटक्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात अंदाजे आठ हजार पेक्षा जास्त भटके श्वान असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे. तर दर वर्षी शहरात सहा हजार पेक्षा जास्त श्वान दंश झाल्याची आकडेवारी सांगते. दोन दिवसांपूर्वी अंबरनाथ मध्ये एकाच परिसरात आठ जणांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी आता अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने निर्बीजीकरण केंद्र सुरू करण्यात आल्याने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.
तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नगरपालिकेने अंबरनाथ शहरात भटक्या श्वानांना अन्न पदार्थ खावू घालण्यासाठी प्रत्येक प्रभागात फीडींग स्पॉट तयार करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार प्राणी मित्रांना त्या त्या भागात जागा सुचवण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. लवकरच प्रत्यक्षात या फिडिंग स्पॉट तयार करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुहास सावंत यांनी माहिती देताना सांगितले.