

डोंबिवली : बजरंग वाळुंज
महाराष्ट्रात राहून मराठीविषयी गरळ ओकणार्या अखिलेश शुक्ला याला राज्य सरकारने निलंबित केल्याचे वृत्त कल्याणात येऊन धडकताच तो राहत असलेल्या कल्याणच्या योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा हाईट्स या इमारतीमधील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. या रहिवाशांनी त्याच्या काळ्या कर्तृत्वाचा बुरखा टराटरा फाडला. मंत्रालयात कधी उच्च पदस्थ अधिकारी, तर कधी आयएएस अधिकारी असल्याचा रूबाब मारणारा अखिलेश कमरेला रिव्हॉल्व्हर लावून अंबर दिव्याच्या गाडीतून फिरतो, त्याचा माज आता उतरला असल्याच्या प्रतिक्रिया महिला वर्गातून उमटू लागल्या आहेत.
मराठी कुटुंबाला मारहाण करणारा मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हीडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिल्यानंतर अखिलेश शुक्ला याने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण तापले होते. तेव्हापासून अखिलेश शुक्ला गायब झाला होता. अखेर दोन दिवसांनी शुक्रवारी (दि.20) समोर आला. याच दरम्यान पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे.
या संदर्भात अखिलेश शुक्ला याने स्पष्टीकरण देताना सांगितले की, दोन दिवसांपासून माझ्या संबंधी प्रकरण व्हायरल होत आहे. एक वर्ष आधी मी माझ्या घराच्या इंटिरिअरचे काम केले. त्यावेळी मी माझा शू-रॅक उजव्या बाजूला घेतला. यावर देशमुख आणि काळवीट्टे कुटुंबाने आक्षेप घेतला. ते आम्हाला एका वर्षापासून त्रास देत होते. आम्ही हा तोडून फेकू, अशी धमकी देत होते. माझ्या बायकोलाही ते त्रास देत होते. शिवीगाळ करत होते. मी ऑफिसमधून आल्यानंतर पत्नी मला याबाबत सांगायची. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो, असाही दावा अखिलेश शुक्ला याने केला.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात सहव्यवस्थापक पदावर नोकरी करणार्या अखिलेश शुक्ला आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. बुधवारी 18 डिसेंबरच्या रात्री कल्याण पश्चिमेकडील योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा हाईट्स या इमारतीमध्ये राहणार्या देशमुख कुटुंबीयांना परप्रांतीय सरकारी अधिकारी आणि त्याच्या गुंडांनी माराहाण केल्यामुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या इमारतीमध्ये अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे यांच्यात घराबाहेर धूप लावण्यावरून वाद झाला होता. या वादात बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याच रागातून अखिलेश शुक्ला आणि त्याच्यासोबत असलेल्या टोळक्याने देशमुख बंधूंना लोखंडी रॉड व अन्य हत्यारांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत झालेले अभिजित देशमुख सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहेत.
अजमेरा हाईट्स या इमारतीमध्ये झालेल्या रक्तरंजित राड्याचा व्हीडियो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीसह सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता या वादात उडी घेतली आहे. तर मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा थेट विधिमंडळ अधिवेशनापर्यंत जाऊन पोहोचला. विधानसभेत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड शब्दांत भूमिका मांडत कारवाईचे आश्वासन दिले. हा महाराष्ट्र शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. जी माहिती दिली, ती ताबडतोब तपासून तो अधिकारी कितीही मोठा असला, तरी त्याची हयगय केली जाणार नाही. त्याच्यावर कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान-सन्मान राज्यात ठेवला जाईल, अशाच पद्धतीने प्रशासन वागेल याची खात्री सभागृहाला देतो. त्यावर तत्परतेने कारवाई करण्याचे आदेशही दिले जातील, असे आश्वासन अजित पवार यांनी विधानसभेत दिले.
या घटनेनंतर महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील टॅलेंट येतात आणि शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक लोक मराठी भाषा उत्तमपणे बोलतात. अनेक जण मराठी सण साजरे करतात. मात्र अशा काही लोकांमुळे सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एखाद्याला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कुणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अश्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
गुरुवारी (दि.19) या सोसायटीमधील नागरिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला. तर या सोसायटीचे पदाधिकारी तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि मनसेच्या पदाधिकार्यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेतली आहे. शनिवारपर्यंत शुक्ला परिवाराला अटक केली नाही, तर पूर्ण योगीधाम परिसर बंद ठेवणार असल्याचे मनसेने डीसीपींना सांगितले. आरोपीवर बी.एन.एस 109 प्रमाणे गुन्हा दाखल करावा अन्यथा जन आंदोलनाची भूमिका शिवसेना शिंदे गटाने घेतली आहे.
कल्याणच्या आजमेरा या उच्चभ्रूंच्या सोसायटीत बुधवारी रात्री घरात धूप-अगरबत्ती लावण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर तुफान राड्यात झाले. या सोसायटीत राहणार्या अखिलेश शुक्ला याच्या चिथावणीवरून आठ-दहा जणांनी मिळून सोसायटीतील मराठी कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. यातील हल्लेखोर मंत्रालयीन अधिकारी असून त्याला पोलिसांनी अटक करावी. मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह त्याच्या साथीदारांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे कलम खडकपाडा पोलिसांनी लावावे, या मागणीसाठी रहिवाशांनी सोसायटीच्या आवारात निदर्शने केली. शुक्ला याने मराठी माणसांचा अपमान केल्याने त्याचा निषेध करण्यासाठी सोसायटीतील रहिवासी गुरुवारी रात्री सोसायटीच्या आवारात जमून निदर्शने केली.
कल्याणात झालेल्या या प्रकाराने आपण आश्चर्यचकित झालो असून याप्रकरणी राजकारण करू नका. मात्र संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे असल्याचे कल्याण पश्चिमचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी याप्रकरणी स्पष्ट केले आहे. कल्याण हे सर्व जातीधर्मांना एकत्रित सांभाळून चालणारे ऐतिहासिक शहर असून इथे अशी घटना घडते. मात्र त्यामध्ये कोणीही राजकारण करू नये यातील जे आरोपी आहेत, त्यांना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे, असे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केले.