

डोंबिवली : अहमदाबाद येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या डोंबिवलीच्या हवाई सुंदरी रोशनी राजेंद्र सोनघरे (वय २७) हिच्यावर गुरुवारी (दि.१९) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अकाली जाण्याने संपूर्ण डोंबिवली परिसर शोकसागरात बुडाला असून, तिच्या राजाजी पथावरील निवासस्थानी आणि अंत्यसंस्कारावेळी जनसागर लोटला होता.
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला झेपावणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-१७१ या बोईंग विमानात रोशनी फ्लाईट अटेंडंट म्हणून कर्तव्य बजावत होती. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान अपघातग्रस्त झाले आणि या भीषण दुर्घटनेत इतर प्रवासी व सहकारी कर्मचाऱ्यांसोबत रोशनीचाही दुर्दैवी अंत झाला. अत्यंत मेहनती आणि जिद्दी असलेल्या रोशनीने खडतर परिस्थितीतून शिक्षण घेत हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न साकारले होते, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
अपघाताची भीषणता इतकी होती की, विमानातील मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. रोशनीच्या कुटुंबीयांची डीएनए चाचणी केल्यानंतर तिच्या मृतदेहाची ओळख पटली. अपघाताची माहिती मिळताच रोशनीचे वडील राजेंद्र सोनघरे आणि भाऊ विघ्नेश हे अहमदाबादला रवाना झाले होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (दि.१८) रोशनीचे पार्थिव त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
बुधवारी (दि.१८) मध्यरात्री एअर इंडियाच्या विशेष विमानाने रोशनीचे पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आले. गुरुवारी सकाळी नऊ वाजता तिचे पार्थिव डोंबिवलीतील राजाजी पथ येथील न्यू उमिया कृपा सोसायटीतील तिच्या निवासस्थानी आणण्यात आले. पार्थिव घरी पोहोचताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. परिसरातील वातावरण पूर्णपणे शोकमग्न झाले होते.
फुलांनी सजवलेल्या स्वर्गरथातून रोशनीची अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये तिचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, एअर इंडियातील सहकारी आणि डोंबिवलीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवमंदिर रोडवरील मोक्षधाममध्ये तिच्या पार्थिवावर वडील राजेंद्र सोनघरे यांनी अग्नी दिला.
रोशनी ही तिच्या आई-वडील आणि भावासोबत राहत होती. मनमिळाऊ स्वभावाच्या रोशनीचे इन्स्टाग्रामवर ५४ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. तिला विमान प्रवासाची आणि विविध देशांना भेट देण्याची आवड होती. यापूर्वी ती स्पाईस जेट या विमान कंपनीत कार्यरत होती आणि दोन वर्षांपूर्वीच ती एअर इंडियामध्ये रुजू झाली होती. परदेशात जाणाऱ्या विमानांमध्ये ती नेहमीच उत्साहाने काम करत असे.
दुःखद बाब म्हणजे, रोशनी लवकरच विवाहबंधनात अडकणार होती. तिच्या कुटुंबीयांनी ठाण्यातील एका प्रतिष्ठित, मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या तरुणाशी तिचा विवाह निश्चित करण्याच्या दृष्टीने बोलणी सुरू केली होती. नोव्हेंबरमध्ये साखरपुडा आणि पुढील वर्षी मार्चमध्ये लग्न करण्याचा त्यांचा मानस होता, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. तिच्या अकाली जाण्याने तिच्या कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.