

ठाणे : श्रद्धा कांदळकर
रासायनिक शेतीच्या मर्यादा ओळखत कालीन तालुक्यातील कोसले येथील श्रीराम विठ्ठल पालवी यांनी सेंद्रिय शेतीचा स्वीकार केला आणि त्यातून पर्यावरणपूरक शेती घडवली. एवढेच नव्हे तर उत्पादनवाढीचा यशस्वी मार्गही त्यांना सापडला. आज त्यांच्या प्रयोगशील शेतीमुळे परिसरातील अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत.
पारंपरिक शेती करत असताना श्रीराम पालवी यांना दरवर्षी खत, कीटकनाशके, मशागत यांवरील खर्च वाढताना अनुभवाला येत होता. परिणामी, उत्पन्नाचे प्रमाण स्थिर असले तरी नफा कमी होऊ लागला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जैविक निविष्ठांमध्ये जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क यांचा वापर सुरू केला. आंबा, भात, हरभरा व भाजीपाला पिकांवर यशस्वी प्रयोग करताना उत्पादनात वाढ झाली आणि पिकांची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली.
शेणखत, गांडूळखत आणि कंपोस्ट खताच्या वापरातून त्यांनी जमिनीच्या सुपीकतेत वाढ केली. तसेच, शून्य मशागतीची शेती या पद्धतीचा अवलंब करत भात लागवडीसाठी डायरेक्ट सीडर वापरला. ज्यामुळे बियाण्यांची आणि मजुरीची बचत झाली. पिक उभं करतानाचा खर्च कमी झाल्याने आर्थिकदृष्ट्या शेती अधिक फायदेशीर ठरू लागली.
“सेंद्रिय पद्धतीने केवळ पर्यावरणाचे रक्षण करता येते असे नाही, तर उत्पन्नही वाढवता येते, हे माझ्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे.”
श्रीराम पालवी
श्रीराम पालवी यांच्या शेतीतील प्रयोगशीलतेची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना “शेतीनिष्ठ” पुरस्काराने गौरवले आहे. ते सध्या एका शेतकरी उत्पादन कंपनीचे अध्यक्ष असून, इतर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.
जमिनीच्या सुपीकतेत वाढ
उत्पादनात स्थिरता व वाढ
कमी उत्पादन खर्च
पर्यावरणपूरक पद्धत
नैसर्गिक, शुद्ध अन्नपदार्थ
टिकाऊ शेती
शेतमालाला चांगला दर
पाण्याचा वापर कमी