

ठाणे : आगरी भाषेच्या समृद्ध साहित्यिक परंपरेचा गौरव आणि नवोदित लेखक, कलाकार, कवी यांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गायक-गीतकार दया नाईक,आगरी संस्कृती अभ्यासक मोरेश्वर पाटील,युवासाहित्यिक सर्वेश तरे,चित्रकार प्रकाश पाटील यांनी आगरी ग्रंथालय चळवळ संस्थेची स्थापना केली. आगरी ग्रंथालय चळवळ यांच्या मार्फत ‘सरावन सरी 2025’ - तिसर्या आगरी साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन 17 ऑगस्ट 2025 रोजी जोशीबाग, श्रीमलंगगड पायथा, कल्याण पूर्व येथे संपन्न होणार आहे.
या संमेलनाचे आयोजन आगरी ग्रंथालय चळवळ आणि समाज कल्याण न्यास यांच्या वतीने करण्यात येत असून, स्वागताध्यक्ष म्हणून धर्मसेवक सोन्या पाटील यांची निवड झाली आहे. तर संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिध्द लोककवी अरुण म्हात्रे हे सूत्रधार म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी, दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन आणि गुरुवंदना या पारंपरिक पद्धतीने होणार आहे. यानंतर संमेलनात विविध विषयांवर आधारित सत्रे पार पडणार आहेत.
संमेलनात पहिल्यांदाच महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारे भाषाप्रभू ह.भ.प. जग्गनाथ महाराज पाटील यांचे आगरी भाषेत प्रवचन होणार आहे. साहित्यसंमेलनात आगरी कथा अभिवाचन हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे, सिनेअभिनेता मयुरेश कोटकर, प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर लेखकांचा सहभाग असून व आगरी खुले कविसंमेलन सुध्दा भरणार आहे. सामाजिक चर्चासत्रे: समाजातील चालू घडामोडींवर चर्चा - सहभागी: सी. ए. निलेश पाटील, सुशांत पाटील, सर्वेश तरे इ.असणार आहेत.
शिवव्याख्याते अॅड.विवेक भोपी यांचे आगरी समाजाच्या ऐतिहासिक बाबींवर आगर्यांच्या शौर्यगाथा हे विशेष व्याख्यान सुध्दा होणार आहे. सोबत पारंपरिक फेर्यांची गाणी, लोककलाकार दिवंगत काशिराम चिंचय (वेसावकर मंडळी) यांच्या स्मृतींना उजाला देण्यासाठी गायक संतोष चौधरी (दादूस), जगदिश पाटील, किसन फुलोरे, चंद्रकला दासरी, संगीता पाटील इत्यादी कलाकार सहभागी होणार असून, दिवंगत काशिराम चिंचय यांना मरणोत्तर आगरी-कोळी रत्न पुरस्कार वितरण होणार आहे. या संमेलनात स्थानिक लोककलावंत, साहित्यिक, समाजसेवक आणि तरुण पिढीचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
संपूर्ण दिवसभर चालणार्या या संमेलनात आगरी भाषा, परंपरा, संस्कृती आणि इतिहास यांचे दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम होणार आहेत. हे संपूर्ण आयोजन मोफत आणि सर्वांसाठी खुले असल्याची माहिती आगरी ग्रंथालय चळवळीचे संस्कृती अभ्यासक चित्रकार मोरेश्वर पाटील यांनी दिली आहे.