Bicycle rally : आग्रा ते राजगड ऐतिहासिक सायकल मोहीम फत्ते; १० दिवसांत ४ राज्ये अन् ७५ हून अधिक गावांचा प्रवास!

५० हून अधिक सायकलपटूंचा सहभाग
Bicycle rally
आग्रा ते राजगड ऐतिहासिक सायकल मोहीम फत्ते
Published on
Updated on

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आणि ‘शिवचातुर्य दिना’निमित्त ‘गरुडझेप मोहीम २०२६’ अंतर्गत आग्रा ते राजगड ऐतिहासिक सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला १७ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सुरुवात झाली आणि २७ ऑगस्ट रोजी राजगड किल्ल्यावर पोहोचून मोहिमेची सांगता झाली.

या दहा दिवसांच्या ऐतिहासिक सायकल मोहिमेत चार राज्ये आणि ७५ हून अधिक गावांमधून सायकलपटूंनी प्रवास केला. आग्रा – ग्वाल्हेर – शिवपुरी – गुना – पाचोर – देवास – ठीकरी – नरडाणा – चांदवड – संगमनेर – भोसरी – राजगड असा या मोहिमेचा मार्ग होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, इतिहास पुन्हा अनुभवणे आणि महाराजांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेला अभिवादन करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. पुणे शहरातील सिंहगड परिसरातील राजेश लता रविंद्र मोरे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. त्यांच्यासोबत अभय खटावकर, मानसिंग वाळुंज, गणेश खाडे, महेश मगदूम, अमित कवितके यांच्यासह ५० हून अधिक सायकलपटूंनी मोहिमेत सहभाग नोंदविला.

यावेळी बोलताना राजेश मोरे म्हणाले, “ही राईड केवळ सायकल मोहीम नसून छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केलेला ऐतिहासिक प्रवास आहे. महाराजांनी आग्रा येथून घेतलेली गरुडझेप आणि त्यांचा अद्भुत पराक्रम पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. आग्रा ते राजगड हा प्रवास करताना महाराजांच्या इतिहासाशी प्रत्यक्ष जोडले गेल्याचा अनुभव आला.” दहा दिवसांच्या या प्रवासात विविध आव्हानांचा सामना करत सायकलपटूंनी मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. आग्रा ते राजगड हा प्रवास सायकलिंगसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केलेले अनोखे अभिवादन ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news