वाडा : वाड्यात ज्वेलर्सकडून चांदीच्या वस्तूंमध्ये तांब्याची भेसळ झाल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
खाद्यपदार्थात भेसळ हा जरी नित्याचा विषय असला तरी आता चांदीच्या वस्तूंमध्ये भेसळ होत असल्याची तक्रार एका ग्राहकाने वाडा पोलिसात केली आहे. ज्वलर्सने चक्क चांदीच्या गणपतीमध्ये तांब्याची भेसळ केल्याचे ग्राहकाचे म्हणणे असून याविरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. वाडा शहरातील एका नामांकित ज्वेलर्सकडून रहिवाशी प्रफुल्ल पाटील यांनी चांदीची मूर्ती खरेदी करून ती बहिणीला भेट दिली होती. काहीच दिवसांत ही मूर्ती काळी पडल्याने ती मोड म्हणून अन्य एका सोनाराकडे दिली असता मूर्तीच्या पाठीमागे तांब्याचा तुकडा टाकून मूर्तीचे वजन वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे प्रफुल्ल यांच्या लक्षात आले. पाटील हे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष असून त्यांचीच फसवणूक झाल्याने ते संतापले आहेत.
ग्राहकांच्या फसवणुकीसोबत धार्मिक भावनांचा खेळ या ज्वेलर्सने केल्याचा प्रफुल्ल यांचा आरोप असून अशा ज्वेलर्सविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी वाडा पोलिसांकडे केली आहे. ग्राहकांनी देखील महागड्या वस्तू खरेदी करतांना सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी यासोबत केले आहे.