उल्हासनगरात अवघ्या दोन डान्सबारवर कारवाई सात डान्सबारना संरक्षण?

कारवाईच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम
उल्हासनगरात अवघ्या दोन डान्सबारवर कारवाई सात डान्सबारना संरक्षण?

उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी एकीकडे सर्व पब आणि लेडीज बारवर कारवाई करण्याचे निर्देश दिले असताना डान्स बारचे माहेरघर असलेल्या उल्हासनगर शहरात अवघ्या दोन डान्स बारवर कारवाई करत उल्हासनगर महापालिकेने तब्बल संरक्षण दिल्याचे समोर आले आहे. अंमली पदार्थमुक्त शहरे करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे कि काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

पुण्यात काही तरुण अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत सर्व पब, लेडीज बार आणि हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उल्हासनगर महापालिकेने तत्परते कारवाई करत शहरातील पल आणि गोल्डन गेट ह्या लेडीज बारच्या आतील काचा आणि टेबल तोडून काढता पाय घेतला. ही कारवाई शुक्रवारी झाली. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी महापालिका बंद असल्याने सोमवारपासून उर्वरित डान्सबारवर कारवाई केली जाईल अशी भाबडी आशा सर्व सामान्यांना होती.

सोमवार आणि मंगळवार उलटून गेल्यावरही महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील डान्सबार वर कारवाई करणे टाळले. त्यामुळे कॅम्प ४ च्या श्रीराम चौकातील किरण हंड्रेड डेज, राखी, नाईटी हे बार नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत धुमधडाक्यात चालू होते. तसेच कॅम्प तीन मधील आचल, वर्षा, चांदनी, पॅराडाईज, आशियाना, टोपाझ, डब्लू डब्लु एफ हे डान्स बार देखील चालू आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने त्यांच्या हद्दीतील डान्सबार आणि पब वर कारवाई केली आहे. त्यामुळे तिकडचे डान्सबार बंद झाल्याने डान्सबार प्रेमी यांनी त्यांचा मोर्चा उल्हासनगरकडे वळला आहे.

डान्सबार विषयावरून ठाकरे गट आक्रमक

उल्हासनगर महापालिकेच्या डान्स बारवरील कुचकामी कारवाईच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे त्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त अजिज शेख यांची भेट घेतली. त्यांनी पालिका प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत शहरातील डान्सबार आणि लॉजिंग बोर्डिंग वर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी उचलून धरली. तसेच पालिकेने कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी बोडारे यांनी दिला. यावेळी त्यांच्याबरोबर राजेंद्र साहू, शिवाजी जावळे, सुरेश पाटील, राजन वेलकर, वर्धन बोडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news