

MSRTC Action on Drunken Staff
ठाणे : एसटी ही महाराष्ट्राची ' लोकवाहिनी ' आहे. दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासी सेवेचा लाभ घेतात. परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याअनुषंगाने एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्याने १ हजार ७०१ संशयित कर्मचाऱ्यांची तातडीने तपासणी केली असता सात मद्यपी कर्मचाऱ्यांना पकडण्यात आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
एसटीच्या मद्यपी कर्मचाऱ्यांना पकडण्यासाठी राज्यभरात एकाच वेळी कोणतीही पूर्वकल्पांना न देता कडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणी मोहिमेत सापडलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता खात्याने २८ ऑक्टोबरला राज्यभरातील सर्व विभागांमध्ये कार्यरत असलेले चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मद्यपान तपासणीची एक मोठी आणि अचानक मोहीम राबविली.
या अचानक केलेल्या तपासणी मोहिमेमुळे महामंडळात एकच खळबळ उडाली. या कारवाईत संशयास्पद एकूण ७१९ चालक, ५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिक कर्मचारी अशा सुमारे १ हजार ७०१ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. अर्थात, ही तपासणी मोहीम प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महामंडळ किती गंभीर आहे, हे दर्शवते. या कारवाईत दोषी आढळलेल्या ७ कर्मचाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित कर्मचारी या व्यापक तपासणी मोहिमेदरम्यान, कर्तव्य बजावत असताना मद्यपान केल्याचे आढळून आले . त्यामध्ये १ चालक आणि ४ यांत्रिक कर्मचाऱ्यांसह एकूण ७ कर्मचारी निलंबित झाले आहेत.
धुळे विभागाच्या तपासणीत एक यांत्रिक कर्मचारी, एक स्वच्छक आणि एक चालक मद्यपान करताना आढळले. नाशिक येथे तपासणी केलेल्यांमध्ये एक चालक दोषी आढळला. परभणी आणि भंडारा विभागांत प्रत्येकी एक यांत्रिक कर्मचारी मद्याच्या अंमलाखाली काम करताना आढळला. नांदेड विभागामध्ये तपासणीत एक वाहक मद्यपान केलेला आढळला.
कर्तव्यावर असताना मद्यपान करणे हा एक गंभीर गुन्हा असून, प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. महामंडळाने या सात कर्मचाऱ्यांवर पुढील कार्यवाही सुरू केली असून, या मोहिमेचा अहवाल तातडीने मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात सादर केला जाईल.
मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रवाशांची सुरक्षा ही एसटी महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भविष्यात नवीन येणाऱ्या बसेस मध्ये चालकाच्या समोर ब्रेथ ॲनालिसिस यंत्र (अल्कोहोल तपासणीसाठी) बसविण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या मद्यपी चालकांना अटकाव होईल. अर्थात, या कारवाईमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गैरव्यवहारांना आळा बसेल, अशी अपेक्षा मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली. जनतेने देखील या मोहिमेचे स्वागत केले असून, या कारवाईमुळे प्रवासादरम्यान अधिक सुरक्षितता अनुभवता येईल. अशी आशा व्यक्त केली आहे.