

माणगाव : कमलाकर होवाळ
नुकताच माणगावपासून 13 किमी अंतरावरावरील वावे दिवाळी गावच्या हद्दीतील महामार्गावरिल पुलाचा कठडा तोडून कार सुमारे तीस फूट खाली कोसळली. झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने गोवा महामार्गीवरिल अपघात आणि अपघाती मृत्यूंची समस्या पून्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली पंधरा वर्ष अत्यंत संथगतीने सुरु आहे. पहिल्याच टप्प्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच इंदापूर ते लाखपाले दरम्यानच्या रुंदीकरणाचे काम ठिकठिकाणी अपूर्ण असल्याने याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या महामार्गावर सतत अपघात होत आहेत. यामुळे महामार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांचा जीव दिवसेंदिवस धोक्यात येत असून अनेक निष्पाप प्रवाशांना बळी जात आहे. हा महामार्ग आणखी किती बळी घेणार ? असा प्रश्न प्रवासी, पर्यटक, नागरीकातून विचारला जात आहे. रायगडसह कोकणच्या विकासाचा महामार्ग ठरणार्या मुंबई-गोवा महामार्गावरून दिवसेंदिवस महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात.
तसेच या मार्गांने प्रवाशीही मोठया संख्येने प्रवास करतात. त्यामुळे महामार्गावर वाढते अपघात होत आहेत. प्रवासी नागरिकांना कांही ठिकाणी या महामार्ग रुंदीकरणाच्या कामाचा नाहक फटका बसत असून अनेक लोकांचे दरम्यानच्या प्रवासात प्राण गेले आहेत. दुसर्या टप्प्याचे काम देखील संथगतीने सुरु असल्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या नावाने कोकणात शिमगा चालू आहे. माणगाव ते इंदापूर दरम्यान 10 कि.मी. अंतरात अनेक ठिकाणी अरुंद मोर्या आहेत. तर कांही मोर्यांना संरक्षित कठडे नाहीत. तसेच रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहेत. त्यामुळे या दरम्यान अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत.
इंदापूर ते टेमपाले दरम्यान महामार्गाचे काम अनेक ठिकणी अपूर्ण आहे. या ठिकाणी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे (डायव्हर्शन) फलक लावले आहेत. त्यामुळे एकाच मार्गाने जाणारी व येणारी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. दरम्यान या मार्गावर अनेक ठिकाणी कुठे मोर्यांचे, पुलांचे तर कुठे रुंदीकरणाचे काम तसेच भराव घालणे यांसह अनेक कामे ठिकठिकाणी अपूर्ण आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यटकांना या मार्गावरून प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. इंदापूर ते लाखपाले दरम्यान रुंदीकरणाचे काम ठिकठिकाणी सुरू असून ते संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत आहे. इंदापूर व माणगाव येथील बायपासचे काम रखडले असून दोनही बाजारपेठेत सातत्येने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धोकादायक असल्याचे दस्तूरखुद्ध रायगड जिल्हा प्रशासनालाच माऩ्य आहे. आणि हीच धोकादायक परिस्थिती विचारात घेऊन गेल्या 20 नोव्हेंबर रोजी कोकणात मतदानाकरिता येणार्या मतदार चाकरमान्याच्या वाहनांचा प्रवास निर्विघ्न व्हावा या करिता गणेशोत्सावाप्रमाणेच जड-अवजड वाहनांची वाहतूक जिल्हाधिकार्यांच्या विशेष आदेशान्वये बंद ठेवण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाकडून गोवा महामार्गावरील निर्विघ्न प्रवासासाठी तात्पूरत्या बंदी आदेशाचा अवलंब करण्यात येतो, मात्र महामार्गाचे काम पूर्ण करुन महामार्ग बिनधोक करण्याकरिता गेल्या पंधरा वर्षांत कायमस्वरुपी कार्यवाही का केली नाही असा सवाल चाकरमान्यांचा आहे.