

उल्हासनगर: आधारवाडी जेलमधील आरोपी आबिद इस्तियाक अन्सारी याला पोटदुखीच्या तक्रारीमुळे उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरोपी संतापला आणि त्याने रुग्णालयातील केबिनच्या काचेवर डोके आपटून घेतले. यामध्ये तो किरकोळ जखमी झाला आहे.
आबिद इस्तियाक अन्सारी हा भिवंडी येथील रहिवासी असून कोनगाव पोलीस ठाणे यांनी त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. तो 2023 पासून आधारवाडी जेलमध्ये बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
मागील दोन दिवसांपासून त्याच्या पोटात दुखत असल्याने कैदी पोलिस त्याला सायंकाळी मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन येण्यात आले होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तपासल्यावर औषध देत दाखल न करता परत जेल मध्ये घेऊन जाण्यास सांगितले.
त्यानंतर चिडलेल्या आरोपीने थेट रुग्णालयातील 13 नंबर कॅबिनची काच स्वतःच्या डोक्याने फोडली. आता तरी मला ऍडमिट करा असा हट्ट धरत त्याने रुग्णालय परिसरात गोंधळ घातला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.