डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकात एका प्रवाशाने तिकिट बुकिंग करणाऱ्या महिलेला कार्यालयात घुसून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.18) दुपारच्या सुमारास घडली. या मारहाणीत तिकीट लिपिक महिला बेशुध्द झाल्याने सहकाऱ्यांनी तिला कल्याणमधील रेल्वे रूग्णालयात दाखल केले आहे. झटापटी दरम्यान या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज गायब झाल्याचे तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले. सुट्ट्या पैशांवरून रेल्वे प्रवासी आणि जखमी महिला यांच्यामध्ये सुरूवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. या वादातून पुरूष प्रवाशाने लिपिक महिलेला मारहाण केली. अन्सर शेख (35) असे मारहाण करणाऱ्या प्रवाशाचे नाव आहे. तर रोशनी पाटील असे जखमी तिकीट लिपिकेचे नाव असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले.
या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवासी अन्सर शेख हा कल्याणच्या रेल्वे स्थानकात लोकल तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकीवर गेला होता. त्यावेळी काऊंटरवर तिकीट लिपिक रोशनी पाटील कार्यरत होत्या. तिकीट लिपिक रोशनी पाटील यांनी अन्सर शेख याला सुट्टे पैसे देण्याची मागणी केली. सुट्टे पैसे दिले तर तात्काळ तिकीट देणे सोयीस्कर होईल, असे लिपिक रोशनी या आरोपी अन्सर याला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र अन्सर याने रोशनी यांच्याशी सुट्ट्या पैशांवरून सुरू झालेला शाब्दिक वाद वाढत गेला. रागाच्या भरात अन्सर शेख हा तिकीट लिपिक बसलेल्या काऊंटरचा दरवाजा ढकलून आत घुसला. त्याने तेथे रोशनी पाटील यांना शिवीगाळ करत ठोसा-बुक्क्यांसह लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. रोशनी यावेळी एकट्याच असल्याने हल्लेखोर अन्सरला प्रतिकार करू शकल्या नाहीत. या हल्ल्यात रोशनी बेशुध्द होऊन कोसळल्या. झालेल्या झटापटीदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज गायब झाला.
हा प्रकार समजल्यानंतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्धावस्थेतील रोशनी पाटील यांना उचलून तातडीने रेल्वे रूग्णालयात दाखल केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांना माहिती मिळताच ते देखिल पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने कल्याण रेल्वे स्थानकात शोध घेऊन रोशनी पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या अन्सर शेख याला अटक केली. अन्सर शेखच्या विरोधात लोहमार्ग पोलिस ठाण्यात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाणीसह सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिकीट लिपिकांना कोणतीही सुरक्षा नसल्याने त्यांच्यावर असे प्रसंग वारंवार गुदरत असतात. अनेक वेळा प्रवाशांच्या शिवीगाळ आणि मारहाणी सारख्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तिकीट लिपीकांच्या खिडक्या, त्यांची कार्यालये, दालन परिसरात सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत काही वेळ कल्याण रेल्वे स्थानकात तिकीट लिपीकांनी काम बंद आंदोलन केले. सरकारने या मागणीचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी रेल्वे तिकीट लिपीकांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.