Thane Crime News | गतिमंद भिक्षेकरी मुलीवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार

अंबरनाथ अत्याचार : पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल; पीडित अल्पवयीन गतिमंद भिक्षेकरी
raped
अल्पवयीन गतिमंद भिक्षेकरी मुलीवर अंबरनाथ शहरात काही अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला.File Photo

अंबरनाथ : परिस्थितीने गंजलेल्या एका अल्पवयीन गतिमंद भिक्षेकरी मुलीवर अंबरनाथ शहरात काही अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने शहरात एकच संतापाची लाट उसळली आहे. बलात्काराच्या या गुन्ह्यात पोलिसांनी पाच मुलं व एका मुलीला अटक केली असून त्यातील तीन मुलं व मुलगी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. तर इतर दोन आरोपींना १८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींविरोधात पोस्को कायद्यांतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडवली येथे राहणारी पिडीत अल्पवयीन मुलगी आपल्या आजी सोबत शुक्रवारी (दि.१२) अंबरनाथ येथील एका मज्जीद बाहेर भिक्षा मागण्यासाठी आले होते. मात्र पिडीत अल्पवयीन मुलगी गतिमंद असल्याने ती आजी पासून दुरावली. ही मुलगी कल्याण-बदलापूर रस्त्यावर चालत असताना तिला दुसऱ्या एका अल्पवयीन मुलीने हात पकडून शूटिंग रेंज येथील एका रिक्षा जवळील काही मुलांजवळ आणले. त्याच वेळेस त्यातील काही मुलांनी या गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार केला. कुणाला सांगितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली.

आपली नात सापडत नसल्याने तिच्या आजीने पिडीत मुलीच्या वडिलांना बोलावून घेतले व पोलिसात तक्रार दिली. शोधाशोध केल्यानंतर पिडीत मुलगी सापडली तेव्हा तिच्या सोबत काहीतरी वाईट घडले असल्याचे तीने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिची मेडिकल केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. पोलिसांनी मोठ्या हुशारीने सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपींना अवघ्या काही तासात शोधून काढले व त्यांना अटक केली. अटक आरोपींमधील तीन मुलं व मुलगी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले तर दोन आरोपींना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पिडीत मुलीला न्याय मिळावा व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुस्लिम जमातचे अध्यक्ष सलीम चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news