बोईसर : बोईसरच्या मधुर चौकातील पाणी भरलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. माहीर मोशीन सिवानी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या अपघातामुळे संतप्त नागरिकांनी एमआयडीसीविरोधात एक तास रास्ता रोको आंदोलन करून अधिकार्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बोईसरच्या मधुर हॉटेल चौकाची पहिल्याच पावसात चाळण झाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मधुर चौकातील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात पालकांसोबत दुचाकीवर बसलेला माहीर मोशीन सिवानी हा चिमुरडा खाली रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्याला प्रथम जवळच्या खासगी रुग्णालयात व त्यानंतर बोईसर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरीकांनी मधुर चौक येथे जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली होती.
या रस्त्याची जबाबदारी असलेल्या एमआयडीसीच्या संबंधित अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली. रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी पोचलेल्या बोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शिरीष पवार यांनी याप्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या अपघात प्रकरणी बोईसर पोलीस स्टेशन येथे नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.