

डोंबिवली : विविध संकल्पनांवर आधारलेला आणि नव्या भारताची नवी ओळख देणारा असा अत्यंत आश्वासक अर्थसंकल्प आहे. तसेच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेशी एकीकरणाचे सुतोवाच करणारा यंदाचा अर्थसंकल्प असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले. रविवारी (दि.2) डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केंद्रीय अर्थसंकल्पीय विश्लेषणाच्या व्याख्याना दरम्यान अर्थतज्ज्ञ टिळक उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.
अर्थतज्ज्ञ टिळक यांचे हे केंद्रीय अर्थसंकल्पावरील विश्लेषणाचे सलग 39 वे वर्ष आहे. 2023 साली त्यांनी या बाबतचा स्व. नानी पालखीवाला यांचा विक्रम पार करत विविध भाषांतून विविध मंचांवर टिळक आपल्या अभ्यासपूर्ण आणि खुमासदार शैलीने केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्यांना उलगडून सांगत आहेत.
यंदा डोंबिवलीतील निमकर कुटुंबीय संचालित सुयोग मंगल कार्यालयात या व्याख्यानाचे आयोजन टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यावेळी जवलपास सव्वतीनशे अर्थप्रेमी आणि जाणकार श्रोत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
Democracy, Demand आणि Demography (लोकशाही, मागणी आणि भौगोलिक परिस्थिती) हे तीन भारतीय अर्थव्यवस्थेचे मुख्य घटक आहेत. या घटकांना अनुसरून अनेक बाबी यंदाच्या अर्थसंकल्पात असल्याचे दिसून येते असे टिळक यांनी सांगितले. Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर आज सगळ्यात जास्त संरक्षण या क्षेत्रात होत असून हा अर्थसंकल्प AI चा वापर इतर अनेक क्षेत्रांमध्ये सरकारद्वारे करण्यात येणार असल्याचेही सुचवतो.
अर्थसंकल्पीय भाषणात गेली वर्षानुवर्षे जे विषय प्रमुख्याने उल्लखले जातात त्या पैकी निर्गुंतवणुकीकरण, विदेशी चलनाचा साठा, नैसर्गिक तेलाचा साठा, रुपयाची जागतिक बाजारातील किंमत, पेट्रोल इत्यादी अनेक विषयांचा विशेष उल्लेख या अर्थसंकल्पात नाही यातूनच हा अर्थसंकल्प नव्या भारताच्या नव्या दिशेने चाललेल्या अर्थव्यवस्थेचे संकेत देतो असेही अर्थतज्ज्ञ टिळक यांनी सांगितले.
बारा लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर बचतीमुळे हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांचा आहे असे जरी म्हटले जात असले तरी देखील मध्यमवर्गाची व्याख्या ही अतिशय व्यक्तिसापेक्ष असून नक्की कोणाला मध्यमवर्ग म्हणायचे याबाबत मतमतांतर असू शकते. तसेच ज्यांचे उत्पन्न मुळातच बारा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना ह्या तरतुदीचा फायदा नसल्याचे स्पष्ट करून अर्थतज्ज्ञ टिळक यांनी हा अर्थसंकल्प खरच आजच्या काळातील शहरातील मध्यमवर्गीयांचा आहे का असा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.
विमा क्षेत्रात शंभर टक्के थेट विदेशी गुंतवणूक करण्याची मुभा असल्याबाबतच्या घोषणा 2016 पासून सरकारकडून केल्या जात आहेत. परंतु याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे अद्याप दिसून येत नाही. तसेच पेन्शन बोर्डाच्या स्थापनेची घोषणा, इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरी उत्पादनाबाबतच्या घोषणा आणि व्यावसायिक बँकांमध्ये पुनर्भांडवलीकरण, आदी अनेक विषयांवर अर्थतज्ज्ञ टिळक यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले.
सद्या सरकारच्या कार्यपद्धतीमध्ये विविध सरकारी कंपन्या किंवा सरकारी कंपन्या आणि खासगी कंपन्यांचे एकीकरण किंवा विलनीकरण करून अनेक मोठे प्रकल्प अस्तित्वात आणले जात आहेत. याबाबतचे उदाहरण म्हणून जम्मू-कश्मीर आणि लेह लडाख येथे वीज निर्मितीसाठी एनटीपीसी, एनएचपीसी आणि एल अँड टी यांच्यात झालेल्या एकीकरणाचा दाखला दिला. हा अर्थसंकल्प देखील भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिक अर्थव्यवस्थेत बरोबर एकीकरण करण्याचे सुतोवाच करणारा असल्याचे अर्थतज्ज्ञ टिळक यांनी सांगितले. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची कार्यकर्ता कुमारी स्नेहा साने हिने सूत्रसंचलन केले. त्यानंतर दोन्ही संस्थांच्या वतीने उपस्थित अर्थप्रेमी आणि जाणकार श्रोत्यांचे आभार मानले