

ठाणे : राज्यात मराठी भाषा बारावीपर्यंत सक्तीची करण्याचा निर्णय घेऊनही मराठीची पीछेहाट थांबलेली नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेमध्ये मराठीत 94 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. मराठी भाषेचा निकाल 92 टक्के तर गुजराती भाषेचा निकाल 100 टक्के लागला. त्यामुळे दहावी बोर्डात मातृभाषेची दांडी गुल झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. राज्यातील जवळपास 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील 94 हजार 544 विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले, जी राज्याची राजभाषा आहे. ज्या भाषेला केंद्र सरकारने नुकताच अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, अशा मराठी भाषेत 94 हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्याचवेळी याच बोर्डाच्या गुजराती भाषेचा निकाल मात्र 100 टक्के लागला आहे. संस्कृत भाषेचा निकाल 99.21 टक्के, अरेबिक भाषेचा निकाल 99.59 टक्के निकाल लागला. मराठी भाषेचा निकाल मात्र 92.57 टक्के लागला आहे.
राज्यात सर्व शाळांना मराठी विषय अनिवार्य असल्याची कायद्यात सुधारणा झाली. बारावीपर्यंत हा विषय अनिवार्य झाला. राज्य शासनाने मराठी भाषा धोरण जाहीर केले. मात्र शालेय शिक्षणात भाषेची पीछेहाट कायम आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत मराठी मातृभाषा असलेले तब्बल 94 हजार 544 विद्यार्थी मराठी विषयाच्याच पेपरमध्ये नापास झाले आहेत. ही आकडेवारी धक्कादायक असून मराठी भाषेच्या अध्यापन प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
* प्रथम भाषा म्हणून मराठी भाषा निवडणारे 10 लाख 87 हजार विद्यार्थी होते. त्यामध्ये 80 हजार 803 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. मराठी शाळा द्वितीय व तृतीय स्थानावर निवडणारे 4 लाख 13 हजार विद्यार्थी होते. त्यातील 13 हजार 741 विद्यार्थी नापास झाले. प्रथम मराठी आणि द्वितीय मराठी अशी निवड केलेले एकूण 94 हजार 544 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या आकड्यावरून महाराष्ट्रातील मराठीचे नव्या पिढीसमोरील स्थान किती महत्त्वाचे आहे, मराठी भाषा शिकविणारे शिक्षक हा विषय किती गांभीर्याने घेत आहेत, हे लक्षात येते.