ठाणे : नवजात बाळाला दवाखान्यात सोडून पित्याचे पलायन ; 23 महिन्यांनी पित्याला अटक | पुढारी

ठाणे : नवजात बाळाला दवाखान्यात सोडून पित्याचे पलायन ; 23 महिन्यांनी पित्याला अटक

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अवघ्या एक दिवसाच्या नवजात बाळाला सोडून पलायन करणाऱ्या पित्याला तब्बल 23 महिन्यानंतर कळवा पोलिसांनी अटक केली आहे. रामभजन गुमानसिंग कुशवाह (28, हरियापुर, आग्रा, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे.

7 जानेवारी 2020 रोजी एक स्त्री व एक पुरुष यांनी कळवा येथील छत्रपत्री शिवाजी महाराज रुग्णालयात एका नवजात अर्भकास सोडून पळ काढला होता. याप्रकरणी कळवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेत नवजात बाळाच्या आई वडिलांचा सतत शोध सुरू ठेवला होता. दरम्यान, बाळास दवाखान्यात सोडून पळून जाणारा व्यक्ती मुलुंड कॉलनी येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कळवा पोलिसांनी नवजात अर्भकास सोडून पळून गेलेल्या व्यक्तीस अटक केली. त्याने सदरचे बाळ आपलेच असल्याची कबुली दिली असून बाळाची पालन पोषणाची जबाबदारी टाळण्यासाठी त्यास दवाखान्यात सोडून पळून गेल्याचे पोलिसांना सांगितले.

दरम्यान, आई-बाबा आपल्या नवजात अर्भकास सोडून पळून गेल्यानंतर त्यास नवी मुंबईतील नेरुळ येथील विश्व बालक केंद्र येथे दाखल करण्यात आले होते. हे बाळ आता 23 महिन्याचे झाले आहे.

हेही वाचा

Back to top button