कल्याण : महिलेची चेन हिसकावून पळणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

कल्याण : महिलेची चेन हिसकावून पळणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात

कल्याण, पुढारी वृत्तसेवा

पादचारी महिलेची चेन हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला महिलेनं काही नागरिकांच्या मदतीने पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली. उमाशंकर पांडे असे या चोरट्याचे नाव असून, कल्याण जीआरपी पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ

गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि लूट होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः रेल्वे परिसरात गुन्हेगारी वाढल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या डझनभर चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्यानंतर ही चोऱ्यांचे सत्र सुरूच आहेत. अशीच एक घटना काल दुपारी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात घडली.

महिलेची चेन खेचून पळणाऱ्या चोरट्याला बेड्या

उल्हासनगरमध्ये राहणारी वॉलसमा जॉर्ज ही महिला काल दुपारच्या सुमारास रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून जात होती. त्यावेळी एका चोरट्याने तिचा पाठलाग केला. ही संधी साधून जॉर्ज यांच्या गळ्यातील महागडी चेन हिसकावून चोरट्याने पळ काढला. जॉर्ज यांनी आरडा ओरड करत चोरट्याचा पाठलाग सुरु केला. काही नागरिकांच्या मदतीने या चोरट्याला पकडून कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, उमाशंकर पांडे असं या चोरट्याचं नाव आहे. याबाबत कल्याण जीआरपीच्या पोलीस अधिकारी अर्चना दुसाने यांनी हा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा

Back to top button