Baby kidnapping case : कल्याण रेल्वेस्थानकातून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

अवघ्या सहा तासांत शोध; अपहरणकर्त्यांना कोठडी
Baby kidnapping case
कल्याण रेल्वेस्थानकातून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरणfile photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण रेल्वेस्थानकातून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याची घटना घडली. मात्र कल्याणच्या म. फुले चौक पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश सोनवणे यांच्या सतर्कतेमुळे अवघ्या सहा तासांत बाळाचा शोध लावण्यात आला. कल्याण रेल्वे स्थानकातून सोमवारी रात्री अपहृत बाळाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.

या बाळाचे अपहरण करणाऱ्या आत्या आणि तिच्या भाच्याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दाखल तक्रारीप्रमाणे बाळाच्या चोरीचा व्हीडिओ समाज माध्यमांमध्ये प्रसारित केला होता. या व्हीडिओच्या आधारे म. फुले चौक पोलिसांनी तपासचक्रांना वेग देत अपहृत बाळ त्याच्या माता-पित्याच्या स्वाधीन करण्यात आले.

Baby kidnapping case
Mahatma Phule Jan Arogya Yojana: महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठा विस्तार; उपचार मर्यादा थेट 10 लाखांवर

या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी ही माहिती दिली. पुणे येथील कुंचे हे कष्टकरी कुटुंब मोलमजुरीच्या निमित्ताने कल्याणमध्ये आले आहे. कल्याणात फिरून दिवसभर मजुरी करून हे दाम्पत्य उपजीविका करतात. राहण्यास जागा नाही. त्यात पाऊस सुरू असल्याने हे दाम्पत्य आपल्या आठ महिन्यांच्या बाळासह रात्रीच्या सुमारास कल्याणच्या रेल्वे स्थानकातील एका आडोशाला मुक्काम करते.

सोमवारी दिवसभर मजुरीचे काम करून हे दाम्पत्य रेल्वे स्थानक परिसरात विश्रांतीसाठी आले. मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असताना या दाम्पत्याजवळ असलेले आठ महिन्यांचे बाळ एका तरुणाने उचलून नेले. सकाळी या दाम्पत्याला जाग आली तेव्हा त्यांना आपले बाळ गायब असल्याचे आढळून आले. कुशीत झोपलेले बाळ गायब झाल्याचे लक्षात येताच आईने हंबरडा फोडला. या महिलेचा हंबरडा पाहून इतर महिला प्रवाशांना गहिवरून आले.

जागरूक प्रवाशांनी या दाम्पत्याला कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सहकार्य केले. अपहृत बाळाचे वडीलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी ज्या ठिकाणाहून बाळ चोरीला गेले त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

मध्यरात्रीच्या सुमारास एक तरुण चोरपावलांनी आला आणि त्याने कुंचे दाम्पत्य झोपलेल्या फलाटावरील ठिकाणी येऊन बाळाला चोरून नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा व्हीडिओ समाज माध्यमांसह पोलिसांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केला.

हा व्हीडिओ महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश सोनवणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बाळाला चोरून नेणारा इसम परिचित असल्याचे, तसेच तो एका भांडण प्रकरणाशी संबंधाने रात्री महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आला असल्याचे आढळले.

Baby kidnapping case
Mumbai Crime : थट्टामस्करीतून 52 वर्षांच्या मित्राची हत्या

हवालदार सतीश सोनवणे यांनी ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांना सांगितली. त्यानंतर अपहृत बाळाचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली. तपासचक्रांना वेग देत या अपहृत बाळाचा शोध अवघ्या सहा तासांत घेण्यात आला.

पोलीस डायरीतील नोंदीवरून काढला माग

पोलीस ठाण्यात रात्री दाखल झालेल्या भांडणाच्या गुन्ह्यातील पत्त्यावर एक पथक गेले, तर अन्य भागात दुसरे पथक बाळाचा शोध घेत होते. एका पथकाने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यातील पत्त्याच्या घरावर छापा टाकला. यावेळी आरोपी अक्षय आणि त्याची आत्या सविता खरे यांच्या ताब्यात असलेले कल्याण रेल्वे स्थानकातून अपहरण केलेले बाळ आढळले. पोलिसांनी बाळाचा ताबा घेऊन अक्षय आणि त्याची आत्या सविता खरे यांना पोलीस ठाण्यात आणले. महात्मा फुले चौक पोलिसांनी हे बाळ लोहमार्ग पोलिसांच्या माध्यमातून सुखरूपपणे बाळाच्या आईच्या ताब्यात दिल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त घेटे यांनी सांगितले. अक्षय आणि त्याच्या आत्याने या बाळाचे कशासाठी अपहरण केले होते, या दिशेने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news