ठाणे : पुढारी वृत्तसेवा : अभिनेता सलमान खान यांच्या घरावर बिष्णोई गँगने गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांना देखील बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला आहे. दरम्यान खंडणीसाठी फोन करण्यात आल्याचे सांगत जर खंडणी दिली नाही तर कफनची व्यवस्था करावी, असेही धमकावले असल्याचे माहिती आमदार आव्हाड यांनी दिली आहे.
सोमवारी दुपारी आव्हाड हे आपल्या घरात असताना त्यांना अनोळखी नंबरवरून एक फोन आला. त्यात तो स्वतःला बिष्णोई गँगचा शार्पशूटर असल्याचे सांगत फोनवर बोलायला सुरुवात केली. तसेच त्याने आपले नाव रोहित गोदारा असे सांगितले असून आपण हा फोन ऑस्ट्रेलियातून करीत असल्याचे ही तो म्हणाला. शिवाय आपल्याच आदेशावरून सलमान खानच्या घरावर गोळीबार केला असल्याचे सांगून त्या इसमाने खंडणीची मागणी केली. जर, ही खंडणी न दिल्यास तुमचे बरेवाईट होईल, त्यासाठी कफन खरेदी करून ठेवा, असे तो म्हणाला. दरम्यान, रोहित गोदरा याच्यासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, तो राष्ट्रीय करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामडी याच्या खून प्रकरणातील आरोपी आहे.