काँग्रेसला धक्का: प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश | पुढारी

काँग्रेसला धक्का: प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :   महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणात नसून त्यामुळे काँग्रेसची फरफट सुरू आहे, त्यामुळे पक्षात अनेक कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत राजू वाघमारे यांनी व्यक्त केला. राजू वाघमारे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राजू वाघमारे यांनी यावेळी बोलताना आपण अनेक वर्षे काँग्रेस पक्षाची भूमिका सक्षमपणे मांडल्याचे सांगितले. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्या मताला काही किंमत राहिलेली नाही.
उबाठा गटाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस पक्ष काम करत असून कुणाचा पायपोस कुणाला उरलेला नाही. त्यामुळे पक्षात अनेक नेत्यांची घुसमट होत असून त्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची शैली आणि ते घेत असलेली मेहनत, दिलेला शब्द पूर्ण करण्याची त्यांची ताकद हे सारे पाहून प्रभावित झाल्यामुळे आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी वाघमारे यांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले. शिवसेना हा महायुतीतील एक प्रमुख घटक पक्ष आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून आपण कायमच सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्य आज एका नव्या उमेदीने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाची मान जगात उंचावली गेली आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यात आज अनेक विकासप्रकल्प सुरू असून परदेशी गुंतवणुकीत राज्य क्रमांक एकवर आहे.
मोदींचे हात बळकट करून पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधानपदी बसवण्याचा निर्धार महायुतीमधील सर्वच पक्षांनी एकत्रितपणे व्यक्त केला आहे. ‘अब की बार चारसो पार’ हा निर्धार पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने कामाला लागलो आहोत. याच मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी,  आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेचे भूमिका अधिक जोरकसपणे मांडण्यासाठी राजू वाघमारे यांची शिवसेना उपनेता आणि सह-मुख्यप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात येत  असल्याचे यावेळी जाहीर केले.
यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे संघटक उदय सावंत हेदेखील उपस्थित होते.
हेही वाचा 

Back to top button