ठाणे जिल्ह्यात येणार १५-१६ मार्चला भारत जोडो न्याय यात्रा  | पुढारी

ठाणे जिल्ह्यात येणार १५-१६ मार्चला भारत जोडो न्याय यात्रा 

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातून भारत जोडो न्याय यात्रा ही १५ आणि १६ मार्च रोजी जाणार आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी हे ठाणे शहरात सभा घेऊन मुंबईला रवाना होतील, अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकारांना दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत असताना ही यात्रा ठाणे आणि मुंबईत येणार आहे. कारण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष्य केंद्रीतकरण्यात आले आहे. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रा ही पालघर जिल्ह्यासह  भिवंडी आणि ठाणे शहरातून जाणार असल्याने विशेष महत्व आले आहे.
भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्यात ही यात्रा  ठाण्यासह मुंबईत येत असल्याने  या यात्रेचे नियोजन आणि कार्यक्रमांची आखणी करण्यासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी ठाणे काँग्रेस मुख्यालयात बैठक घेतली.  त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून यात्रेबाबत माहिती दिली.  यावेळी ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, शहर सचिव सचिन शिंदे, भालचंद्र महाडिक, संदीप शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.  यात्रेची माहिती देताना थोरात पुढे म्हणाले, ही यात्रा १२ मार्चला गुजरातमधून राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक मार्गे ती १५ मार्चला वाडा, भिवंडी येथे येऊन भिवंडीत मुक्काम करणार आहेत. १६ मार्चला ही यात्रा ठाणे शहरात येईल. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची सभा होणार आहे.  त्यानंतर यात्रा मुलूंड येथे थांबेल आणि १७ मार्चला दादर चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप होईल. याच दिवशी ते मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
भिवंडी येथून मुंबई – नाशिक महामार्गे भारत जोडो न्याय यात्रा खारेगाव मार्गे मुंब्रा-कौसा, कळवा, कोर्टनाका, जांभळीनाका, राम मारुती रोड, गोखले रोड, तीन हात नाका येथून मुलूंडला जाईल. जांभळी नाका येथे राहुल गांधी हे यात्रेच्या वाहनांवरूनच सभा घेऊन उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

Back to top button