Ravindra Chavan On Aditya Thackeray : श्रेय घेण्यासाठी सरकार थांबत नाही; रविंद्र चव्हाण यांचे आदित्य ठाकरेंना उत्तर

Ravindra Chavan On Aditya Thackeray : श्रेय घेण्यासाठी सरकार थांबत नाही; रविंद्र चव्हाण यांचे आदित्य ठाकरेंना उत्तर

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: राज्यात ४० जोकर सगळीकडे फिरत असल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केली होती. अनेक कामे पूर्ण होऊन सुद्धा उद्घाटन केले जात नाही. दिघा रेल्वे स्टेशन, डोंबिवली-माणकोली पुलासह इतर पूर्ण झालेल्या कामांच्या उद्घाटनांसाठी वेळ नाही, म्हणून लोकांना तिष्ठत ठेवले जात असल्याची टीका आमदार ठाकरे यांनी केली होती. या टीकेला डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सडेतोड उत्तर देत टोला लगावला आहे. श्रेयाच्या लढाईत आता कदाचित आदित्य ठाकरेही उतरले आहेत. मात्र उद्घटनासाठी नव्हे, तर श्रेयासाठी हे सरकार थांबत नसल्याचे उत्तर मंत्री चव्हाण यांनी दिले. Ravindra Chavan On Aditya Thackeray

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या प्रत्येक योजना कार्यान्वित होण्यासाठी रेल्वेच्या योजनांत ५० टक्के हिस्सा राज्य शासनाने द्यायला हवा होता. गेल्या वेळेस जे अडीच वर्षांसाठी सरकार होते. त्या सरकारने हा हिस्सा दिला नाही. त्यामुळे सर्व कामे महाराष्ट्रात मागे राहिली. आता याचे-त्याचे उद्घाटन केले नसल्याचा गोष्टी करत आहेत. मात्र, ते किती अयोग्य आहे, हे मला माहित आहे. मोठा गाव-माणकोली पूलाच्या बांधकामाची सुरूवात २००९ सालात झाली. त्याच सालात मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होती. शेवटच्या टप्प्यात पुलाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. वित्तीय मान्यता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मिळाली. आणि कामाला सुरूवातही मुख्यमंत्री फडणवीस असताना झाली. Ravindra Chavan On Aditya Thackeray

वास्तविक पाहता एखादा प्रकल्प जेव्हा पूर्णत्वास जात असतो. त्यावेळेला एक पद्धत सुरु झालेली आहे. काम ज्यावेळेला पूर्ण होते. त्यावेळेस श्रेय कुणाला मिळावे, यासाठी चढाओढ लागते. श्रेयाची लढाई प्रत्येकजण करत असतो. त्यामुळे कदाचित आता आदित्य ठाकरेही श्रेयाच्या लढाईत उतरले असल्याचे वाटायला लागले आहे. किंबहूना अडीच वर्षे ज्यांच्याकडे सत्ता होती. त्यांचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाले होते. आता खऱ्या अर्थाने शासन आले आहे. हे शासन या गोष्टींकडे लक्ष देत आहे. महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात एक नंबर कसा येईल, या दृष्टीकोनाने हे सरकार काम करत आहे. दिघा रेल्वे स्टेशन आणि मोठागाव-माणकोली पुलाचे लोकार्पण लवकरच होईल. उद्घटनासाठीच नव्हे, तर श्रेयासाठी हे सरकार थांबत नाही. काम पूर्ण झाले की त्याचे लोकार्पण केले जाते. त्यामुळे आपण त्याची चिंता करू नका. श्रेय घेण्यासाठी हे सरकार थांबत नाही, असाही टोला मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला लागवला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news