पाच वर्षातच ठाण्यातील गायमुख चौपाटी खचली | पुढारी

पाच वर्षातच ठाण्यातील गायमुख चौपाटी खचली

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील बहुचर्चित गायमुख चौपाटी अवघ्या पाच वर्षातच खचली असून या चौपाटीवर जाण्यासाठी आता पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. खाडीच्या बाजूचा काही भाग खचल्याचे दोन महिन्यापूर्वीच लक्षात आल्याने ही चौपाटी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाच वर्षातच चौपाटीचा भाग खचल्याने कामाच्या दर्जाबाबतच साशंकता निर्माण झाली असून चौपाटीवर खर्च करण्यात आलेला कोट्यवधींचा खर्चही पाण्यात गेला असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

ठाण्यातील गायमुख येथे ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र मरिटाईम बोर्ड यांच्या सहयुक्त विद्यमानाने मुंबईतील मरीन ड्राईव्ह च्या संकल्पनेतून गायमुख येथे चौपाटी विकसित करण्यात आली आहे. ठाण्यातील पहिली चौपाटी चौपाटी म्हणून या चौपाटीला मान मिळाला होता .या चौपाटीचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट २०१९ ला करण्यात आले होते. ठाण्यातील नागरिकांना मनोरंजन व विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी ही चौपाटी विकसित करण्यात असून या चौपाटीला हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. ठाणे महापालिकेने या चौपाटी करिता मेरी टाईम बोर्डला १२ कोटी ८४ लाखांचा निधी दिला होता. मागील काही दिवसांपासून चौपाटी चा काही भाग खचत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले होते. खाडीकडील भागात लावण्यात आलेल्या लोखंडी खंबाचा परिसरातील भागात सुमारे अर्धा ते एक फूट इतका खड्डा पडला आहे . त्या भागात मोठी दुर्घटना होऊन पर्यटकांच्या जीवावर बेतू नये यासाठी तो भाग सील करण्यात आला असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

घोडबंदर भागातील नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी आ प्रताप सरनाईक यांनी गायमुख चौपाटी सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा देखिल त्यांनी केला होता. मेरी टाईम बोर्डने या चौपाटीचे काम केले असून त्याची निगा आणि दुरुस्ती देखिल मेरीटाईम बोर्डच पाहत आहे.

या बाबत मेरी टाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता अजित मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि खाडीच्या बाजूचा काही भाग खचल्याचे दोन महिन्यापूर्वी आम्हाला समजले होते. त्यानंतर आय आय टी मधील तज्ज्ञशी संपर्क साधण्यात आला होता. २० ते २५ दिवसांपूर्वी आयआयटी मार्फत प्रत्यक्ष खचलेल्या भागाची पाहणी करून त्यांनी ज्या काही सूचना केल्या आहेत त्यानुसार खचलेला भाग काढून पुन्हा त्याची बांधणी करण्यात येणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले. यासाठी अंदाजे ३ कोटींचे एस्टीमेट करण्यात आले असून दुरुस्तीचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्या भागात पर्यटक जाऊ नये यासाठी तो परिसर सील करण्यात आला असल्याचे माहिते यांनी सांगितले.

Back to top button