Uddhav Thackeray: मुंब्रा शाखेवरून राजकारण तापले; उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडले | पुढारी

Uddhav Thackeray: मुंब्रा शाखेवरून राजकारण तापले; उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडले

ठाणे : पुढारी वृत्तसेवा: मुंब्रा येथील शिवसेना शाखा शिंदे गटाकडून नुकतीच जमीनदोस्त करण्यात आली आहे. या शाखेची पाहणी करण्यासाठी आज (दि.११) संध्याकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बॅनर्स लावले होते. ते फाडण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने- सामने आल्यास कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून मुंब्र्यात १४४ कलम लावण्याची शक्यता आहे. Uddhav Thackeray

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादातून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती. तसेच, शिंदे गटाने नव्याने शाखा बनविण्यासाठी मंगळवारी भूमिपूजन केले होते. आज उद्धव ठाकरे जमीनदोस्त केलेल्या शाखेच्या ठिकाणी भेट देणार आहेत. त्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापले आहे.  Uddhav Thackeray

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात बॅनर लावले होते. त्यातील ९० टक्के बॅनर फाडल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी याचा एक व्हिडीओ ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर शेअर केला आहे. दरम्यान यापूर्वीच शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक राजन किणे यांना पोलिसांनी १४९ ची नोटीस बजावली आहे. तर उध्दव ठाकरे यांना देखील ठाणे पोलिसांची एकतर्फी नोटीस बजावण्याचे शक्यता आहे. मुंब्रा येथील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस १४४ कमल लागू करण्याची शक्यता आहे.

कलम १४४ नुसार मुंब्रा शाखेच्या आसपास १०० मीटर पर्यंत कोणालाही प्रवेश नाही, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रवेशबंदी करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमणार आहेत. सोबतच शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील जमणार असल्याने विरोध प्रदर्शन होऊ शकते. त्यामुळे प्रवेश बंदी करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील ठाकरे गटाला जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. दिवाळीचा सण आहे, उध्दव ठाकरे कशासाठी येत आहेत? मुंब्रा इथे हिंदू -मुस्लिम गुण्या गोविंदाने राहतात, ती शांतता भंग करण्यासाठी उध्दव ठाकरे येत आहेत का, आजपर्यंत त्यांना मुंब्र्यात का यावेसे वाटले नाही. ती शाखा आमची आहे, कायदेशीररित्या आमच्या ताब्यात आहे, त्यामुळे तिकडे येऊन जर काही बोलणार असतील, तर आम्ही देखील विरोध करणार, मी स्वतः कार्यकर्त्यांसह तिकडे उपस्थित असणार, आणि विरोध करणार असा इशारा म्हस्के यांनी दिला आहे.

Uddhav Thackeray : शिंदे गट आणि ठाकरे गटाने लावले बाजुबाजूला बॅनर

शिंदे गटाच्या बॅनरमधून शाखेचे आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्यात आले आहे. तर ठाकरे गटाच्या बॅनरमधून स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून देखील उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. “त्यांना यायचे तर येऊ द्या, आम्ही आमच्या शाखेजवळ उभे राहणार”, “स्थानिक राष्ट्रभाईच्या आमदारामुळे आज उद्धव ठाकरे येत आहेत इतकी वर्षे त्यांना आठवण झाली नव्हती”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी राजन किणे यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button