ठाणे : कोपरी परिसरात चक्क बसच घरात घुसली | पुढारी

ठाणे : कोपरी परिसरात चक्क बसच घरात घुसली

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : हल्लीच्या काळात कधी काय होईल याचा काही नेम नाही. कोपरी परिसरात एक खासगी बस चक्क घरात घुसल्याची घटना आज (दि. ११) रात्री घडली. बस चालक दारूच्या नशेत असल्याने त्याचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून रोडच्या बाजूला उभ्या केलेल्या वाहनांचे आणि घराचे नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर स्थनिकांमध्ये तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनचालकाला ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री उशिरा या मद्यपी वाहनचालकाच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाणे पूर्वेतील कोपरी हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. परंतु या ठिकाणी खाजगी कंपन्यांच्या बसेस पीक ड्रॉपसाठी थांबा आहे. मात्र, त्या परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती असल्याने लहान मुले, नागरिकांची वर्दळ सुरू असते. तसेच सकाळच्या सुमारास कपडा बाजार भरलेला असतो. या जमलेल्या बसमुळे नेहमी स्थानिकांना वाहतूक कोंडी, कर्कश्य हॉर्नचा स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. या अपघातात बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस फुटपाथ पार करून घरावर चढली आणि रिक्षासह पार्क केलेल्या गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.

Back to top button