कोकण पदवीधरसाठी 65 टक्के मतदान

1 जुलैला मतमोजणी होणार
Konkan Graduate Election
कोकण पदवीधरसाठी 65 टक्के मतदान झाले. Pudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : लोकसभेच्या निकालानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढविताना सोबत पुन्हा मनसेला घेतले. दुसरीकडे महाविकास आघाडीने एकत्रित प्रचार करीत निवडणुकीत चुरस निर्माण केली. त्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पदवीधर मतदार मतदानासाठी बाहेर पडले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. कोकण पदवीधर मतदारसंघात सुमारे 65 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक 74 टक्के मतदान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले. गतवर्षीपेक्षा मतदानाचा टक्का वाढल्याने याचा फायदा कुणाला होईल, या चिंतेने सर्व उमेदवारांना ग्रासले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्यात थेट लढत झाली. तसेच 11 अन्य अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आणि सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुमारे 65 टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासांमध्ये 7.30 टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यन्त 59. 31 टक्के मतदान झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक 73. 62 टक्के मतदान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर सर्वांत कमी 54. 28 टक्के मतदान हे ठाणे जिल्ह्यात झाले. खरे तर या मतदारसंघात 2 लाख 23 हजार 225 मतदारांपैकी सर्वाधिक 98 हजार मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. रायगड जिल्ह्यात 54 हजार 931 मतदार, पालघर 28 हजार 333 मतदार, रत्नागिरी 22 हजार 686 मतदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 18 हजार 551 मतदार आहेत. या मतदारांपैकी 65 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणी ही 1 जुलै रोजी नेरुळ येथे होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात 63.35 टक्के मतदान

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी जिल्ह्यात 38 मतदान केंद्रांवर मतदान झाले. पाऊस असतानाही जिल्ह्यात पदवीधरांचे चांगले मतदान झाले. जिल्ह्यात 63.35 टक्के इतके मतदान झाले आहे. रत्नागिरीमध्ये असलेल्या मतदान केंद्राबाहेर पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यात 22 हजार 681 पैकी 14 हजार 368 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news