ठाणे : डोक्यात हातोडी घालून पत्नीचा निर्घृण खून | पुढारी

ठाणे : डोक्यात हातोडी घालून पत्नीचा निर्घृण खून

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची घटना मुंब्रातल्या आंबेडकर नगरात समोर आली. जरीन अन्सारी (30) असे या घटनेत मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी विजय उर्फ समीर कमलनाथ मिश्रा (36) यास मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी व मयत महिला यांचा प्रेमविवाह झालेला होता. गेल्या काही दिवसांपासून आरोपी हा आपल्या पत्नीला सोडून भिवंडीत राहत होता. तर त्याची पत्नी जरीन ही आपल्या दोन मुलांसह आईकडे मुंब्रात राहत होती. विभक्त राहत असल्याच्या कारणावरून जरीन व आरोपी विजय यांच्यात वाद सुरू होता. दरम्यान, गुरुवारी आरोपी आपल्या पत्नीची हत्या करण्याच्या हेतूने मुंब्रात आला होता. त्याने पत्नी सोबत वादविवाद सुरू केला अन आपल्यासोबत आणलेल्या हातोड्याने जरीनच्या डोक्यावर प्रहार करून तिची हत्या केली. यावेळी जरीनची आई तिला वाचवण्यासाठी मध्ये आली असता आरोपीने तिच्यावर देखील हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर मुंब्रा पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीस बेड्या ठोकल्या. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button