Thane News : ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अनधिकृत बांधकामांच्या प्रदर्शनाचे आयोजन; भाजप-सेनेत जुंपली | पुढारी

Thane News : ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अनधिकृत बांधकामांच्या प्रदर्शनाचे आयोजन; भाजप-सेनेत जुंपली

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यासह दिवा शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा सातत्याने गाजत असतानाच, भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शहर बकाल होण्यास शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि पालिका अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पुराव्यांसह तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा दौऱ्यावेळी बेकायदा बांधकामांचे प्रदर्शन भरवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.  यातून वाद अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात शिवसेना आणि भाजप एकत्रित सत्तेवर असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील दिवा परिसरात मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये फारसे पटत नसल्याचे चित्र आहे. दिव्याच्या विकासासाठी ८०० कोटी रुपये देऊन ही दिवा शहर बकाल होण्यास शिवसेना स्थानिक नेते आणि पालिका अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध जबाबदार असल्याचा गंभीर आरोप भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे. दिवा शहरात पाण्याचा मोठा प्रश्न असतानाही पिण्याचे पाणी बेकायदा बांधकामांना देण्यात येत आहे.  आर्थिक लाभासाठी येथील प्रशासन व स्थानिक शिवसेना बेकायदा बांधकामाचा भस्मासुर उभा करत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी देऊनही पालिका प्रशासन अर्थपूर्ण संबंधामुळे बेकायदा बांधकामांवर कारवाई करत नसून त्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा दौऱ्यावेळी बेकायदा बांधकामांचे प्रदर्शन भरवणार आहे. एकीकडे क्लस्टर योजना होत असताना दुसरीकडे अनधिकृत बांधकाम जोमाने वाढत असल्याने क्लस्टर योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यातून भाजप आणि शिवसेनेतील (शिंदे गट) वाद अधिक विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Back to top button