ठाकरे गटाच्या आणखी एका महिला पदाधिकारीला धमकी; पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे दिली तक्रार | पुढारी

ठाकरे गटाच्या आणखी एका महिला पदाधिकारीला धमकी; पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे दिली तक्रार

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्या मारहाणीच्या प्रकरणामुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. असे असताना देखील ठाकरे गटाच्या आणखी एका महिला पदाधिकारीला शिवसेनेच्या माजी नगरसेविकेने धमकावल्याचा प्रकार समोर येत आहे. ठाकरे गटाच्या स्मिता आंग्रे असे आरोप करणाऱ्या महिला पदाधिकारीचे नाव आहे. त्यांनी हा आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यावर केला आहे. तर भोसले यांनी आपल्याविरोधात फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे आपले चारित्र्यहनन झाले असल्याचा आरोप करत आंग्रे यांच्यावर केला आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका नम्रता भोसले यांनी केली आहे. दोन्ही गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त जयजित सिंह यांना पत्र दिले आहे.

ठाण्यात रोशनी शिंदे यांच्या प्रकरणामुळे एकीकडे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. या मारहाणीचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने ठाण्यात मोर्चा देखील काढण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असताना आता माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यावर व्हॉट्सअॅपवर धमकी दिल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कोपरी पाचपाखाडी विभागातील विधानसभा अधिकारी स्मिता आंग्रे यांनी केला आहे. आंग्रे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात त्यांनी नम्रता भोसले यांनी आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे लिहिले आहे. यामध्ये रोशनी शिंदेची हालत बघितली ना? आता तुझा नंबर आहे, तुझी हालत तशीच होईल अशी थेट धमकी देऊन शिवीगाळ केली असल्याचे त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. यासंदर्भात त्या श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याने पोलीस आयुक्तांना पत्र दिले असल्याचे आंग्रे यांनी सांगितले.

दुसरीकडे माजी नगरसेविका नम्रता भोसले यांनी देखील पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहेय यामध्ये त्या म्हणाल्या की, फेसबुकवर आपली जाणीवपूर्वक बदनामी करून आपले चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवर स्मिता आंग्रे यांनी नावाचा विपर्यास करून आक्षेपार्ह पोस्ट टाकली असल्याचे भोसले यांचे म्हणणे आहे. तसेच बाळराजे साळुंखे नामक व्यक्तीने माझी समाजातील प्रतिमा मालिन होईल अशी कमेंट केली असून, या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी भोसले यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

Back to top button