उल्हासनगर : जीवघेणा हल्ला करुन लुटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांच्या आत ठोकल्या बेड्या

उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत लूटमार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी गावदेवी रस्त्यावर घडली. २४ तासांच्या आत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
विद्यानंद पांडे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विद्यानंद पहाटेच्या सुमारास नाईट ड्युटी करून चहा पिण्यासाठी गावदेवी मंदिर परिसरातून जात होता. याच वेळेस रिक्षातून आलेल्या पाच ते सात तरुणांनी त्याला दमदाटी करून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी नकार देताच त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विद्यानंद हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्ह्यांची गांभीर्याने विचार करून तपासाची चक्रे फिरवली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक धनंजय कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत पोलीस हवालदार सुचित निचिते, पोलीस हवालदार गाणे, पोलीस शिपाई समीर गायकवाड, कृपाल शेकडे, हनुमंत सानप, मंगेश वीर, गणेश ढमाले, गणेश राठोड, चंदू गायकवाड, गोरखनाथ राख यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये दिसणाऱ्या आरोपींची ओळख पटल्यावर तांत्रिक विश्लेषण आणि त्यांच्या घरी छापे मारून २४ तासांच्या आत चार जणांना आशेळे गावातून अटक केली आहे.
ह्यात रोहन उज्जैनकर, गौतन वानखेडे, सुमित कदम उर्फ लाल आणि मुरलीकुमार झा अशी चौघांना अटक केलेल्याची नावे आहेत. विशेषतः याच आरोपींनी कोळसेवाडी, उल्हासनगर आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुडकूस घालून रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना अडवून जबरी चोरी करून हल्ला करत होते. यांना अटक करणे पोलिसांसमोर एक आव्हाने होते, अखेर पोलिसांनी २४ तासांच्या आत चौघांना अटक करत मुसक्या आवळल्या आहेत.