ठाण्यात लागले राहुल गांधींच्या समर्थनार्थ पोस्टर्स | पुढारी

ठाण्यात लागले राहुल गांधींच्या समर्थनार्थ पोस्टर्स

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्वरित हालचाल करत केंद्रातील भाजपा सरकारने राहुल गांधी यांची संसद सदस्य पदाचे निलंबन केले. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे शहरात समर्थनार्थ पोस्टर्स लावून ‘सूडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ असा संदेश दिला आहे.

राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ मध्ये कर्नाटकाच्या कोलार येथे प्रचंड जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. या रॅलीत त्यांनी मोदींची तुलना थेट नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्याशी केली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी सर्वांची आडनावे एक समान कशी? सर्व चोरांची नावे मोदी का असतात? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. या प्रकरणी सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता.

तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या प्रकाराचा निषेध सर्वच स्तरातून होत आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये फलक लावले आहेत. भारत जोडो यात्रेमधील काही छायाचित्रे वापरुन हे पोस्टर्स तयार करण्यात आले असून छायाचित्रांखाली ‘सूडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ असा संदेश लिहिला आहे. शिवाय “वुईस्टँडविथ राहुल गांधी“ असा हॅशटॅगही दिला आहे. या पोस्टर्सची सबंध ठाणे शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

हेही वाचा : 

Back to top button