तापमानवाढीमुळे बारमाही नद्यांच्या पातळीत घट | पुढारी

तापमानवाढीमुळे बारमाही नद्यांच्या पातळीत घट

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  वाढत्या तापमानवाढीचा परिणाम बारमाही नद्यांच्या पाण्यावर होत असून, मोठ्या प्रमाणावर पाण्याची पातळी कमी होत आहे. कोकणातील पाच नद्यांवर याचा परिणाम झाल्याचे चित्र पुढे आले आहे. कोकणात चौदा बारमाही नद्या आहेत. गेल्या पाच वर्षांत या नद्यांचे पाणी दहा टक्क्यांनी घटले आहे.

तापमान वाढ हा विषय राज्यातील सर्वच भागांमध्ये आढळून येतो. खरे तर भारताच्या गंगा, सिंधू या महत्त्वाच्या नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणावर कमी होऊ लागले आहे. बर्फाचे होणारे वाढते विघटन काळजीचा विषय आहे. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांचे पाणी कमी झाल्याचे यूएन संस्थेने म्हटले आहे. जगातील एकूण क्षेत्रफळाच्या 10 टक्के भाग हा बर्फाळ आहे. बर्फाचे प्रमाण कमी झालेले आहे. जागतिक पातळीवर याचा फटका बसत आहे तसेच प्रत्येक भागावर याचा परिणाम जाणवू लागला आहे.

कोकणात दमणगंगा, तानसा, वाशिष्ठी, भातसा, कुंडलिका, आंबा, उल्हास, पाताळगंगा, गडनदी, काळू, सावित्री, वैतरणा, सूर्य, देवगड अशा महत्त्वाच्या नद्या आहेत. या नद्या बारमाही वाहत आहेत. मात्र, नैसर्गिक नद्यांमध्ये तयार असलेली नैसर्गिक कुंडले कमी झाल्याने पाणी पातळीत घट झाली आहे. कोकणातील भूगर्भातील पाणी पातळीतही मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. वीस वर्षांपूर्वी 200 फुटांवर कूपनलिकांना पाणी मिळत होते. मात्र आता साडेतीनशे ते चारशे फूट खोल कूपनलिका खोदाव्या लागतात. एवढ्या प्रमाणात पाणी पातळी खोल गेली आहे.

नद्यांमधील पाणी पातळी कमी होण्याचे कारण पूर्वीची नैसर्गिक पाणी साठ्याची कुंडे भरावाने भरून गेली. यामुळे प्रामुख्याने ठाणे मधील बदलापूर, रायगडमधील महाड आणि रत्नागिरी येथील चिपळूण या भागात मोठ्या महापुराचा सामना करावा लागत आहे. शासनाने गाळ काढण्यासाठी आता निधी मंजूर केला आहे. मात्र, हे गाळ काढण्याचे काम संथगतीने होत आहे. जेवढा गाळ काढला जातो तेवढा पावसाळ्यात पुन्हा येऊन भरतो. त्यामुळे पाणी कमी होण्याचे आणि पूर येण्याचे प्रमाण वाढले आहे. जागतिक तज्ज्ञांच्या मते तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वेगाने वाढत आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम मोठे होतील. एका बाजूला खारे पाणी वाढत आहे, तर तापमानवाढीमुळे गोड्या पाण्याचा स्रोत कमी होऊ लागले आहेत. ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पाणी अडविण्याचा कार्यक्रम किती वर्षांत

कोकणासारख्या भागात पावसाळ्यात पडणारा साडेतीनशे मिलिमीटर पाऊस आणि त्यातून निर्माण होणारे पाणी अडविणे हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. कोकणात प्रचंड पाऊस पडूनही पाणी अडविले जात नसल्याने फेब्रुवारीनंतर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून दमणगंगासह पाच नदी खोर्‍यांतील पाणी अडविण्याचा कार्यक्रम शासनाने जाहीर केला आहे; मात्र हा कार्यक्रम किती वर्षांत पूर्ण होणार, याचे कोणतेही वेळापत्रक नाही.

Back to top button