

ठाणे ः आता कोकणातील पुढची लढाई शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशीच पाहायला मिळणार आहे. याची झलक उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन नेत्यांच्या जाहीर सभांमधून दिसून आली. कोकण हा शिवसेनेचा मजबूत बालेकि ल्ला म्हण्ाून असलेला प्रदेश. या भागात एकेकाळी नारायण राणे, रामदास कदम, सुरेश प्रभ्ाू, प्रा. मधू दंडवते, भाई सावंत अशा वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांचा प्रभाव राहिलेला हा भाग आहे. दिवस पुढे सरकतात, तसे राजकारणही बदलत जाते. या भागावर शिवसेनेबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशा पक्षांचेही प्राबल्य राहिले आहे. नेते पक्ष बदलतात तसे राजकीय पक्षांचे प्रभावक्षेत्रही बदलते हा अनुभव कोकणातही आहे. नारायण राणेंचा प्रवास शिवसेना, काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिला आहे. रामदास कदम यांचा प्रवास उद्धव ठाकरे ते एकनाथ शिंदे असा झाला आहे.
कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 5 मार्च रोजी खेडच्या गोळीबार मैदानात झालेल्या राजकीय सभेनंतर वातावरण ढवळून निघाले आणि अवघ्या 15 दिवसांत 19 मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्तरसभा त्याच मैदानावर त्याच ठिकाणी झाली. या दोन्ही सभांमध्ये गर्दी जमवण्यात दोन्ही पक्षांना तेवढेच यश आल्याने तोडीस तोड सभा असे वर्णन करता येईल. या सभांमुळे कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय रणांगणात आरोपांच्या फैरींनी वेग घेतला आहे. कोकण हा गेली 25 वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. कोकणातील एकूण विधानसभेच्या 38 आणि लोकसभेच्या 7 जागांपैकी शिवसेनेने विधानसभेच्या जवळपास 16 आणि लोकसभेच्या 5 जागा जिंकल्या होत्या. मात्र आता शिवसेनेत उभी फूट पडल्यांनंतर शिवसेनेचे दोन गट हे एकमेकांसमोर ठाकले आहेत. भाजप सोबत एक गट तर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेससोबत दुसरा गट अशी शिवसेनेची झालेली विभागणी यामुळे सर्वाधिक प्रभाव असलेल्या कोकणात या पक्षातील फुटीची सर्वाधिक झळ बसली आहे.
कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्हा परिषदा आणि जवळपास 40 हून जास्त नगरपालिका, सात महापालिका या स्वराज्य संस्थांवर यापूर्वी शिवसेनेचे चांगले प्राबल्य राहिले आहे. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर कोणाचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 5 मार्चच्या खेड येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी 'देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकू', असा इशारा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता. याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी 'तुमच्या कृतीमुळेच पक्ष फुटला. आता हम दो, हमारे दो एवढेच तुमच्याकडे राहतील', असा इशारा दिला. कोकणात सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंत दोन्ही गटांचे नेते आमने-सामने ठाकले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या सभेत खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, अनंत गीते आणि शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार संजय कदम यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. रश्मी ठाकरेंपासून सुभाष देसाई, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अनिल परब, भास्कर जाधव, राजन साळवी, सूर्यकांत दळवी, अमोल कीर्तिकर, सुषमा अंधारे, केशवराव भोसले या नेत्यांनी ठाकरे गटाची मदार सांभाळली होती. ठाकरेंच्या सभेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून शिवसेना नेते रामदास कदम अस्वस्थ झाले. त्यांनी दुसर्या दिवशी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांच्या सभेची घोषणा केली होती. या घोषणेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोडीस तोड सभा त्याच मैदानावर घेण्यात आली. यावेळी रामदास कदम, गजानन कीर्तिकर, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर आणि स्थानिक आमदार योगेश कदम यांनी ठाकरे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर राजकीय टीका तर केलीच; त्याचबरोबर कोकण विकासाच्या काही घोषणाही केल्या. यामध्ये रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग पुढच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार, ग्रीनफिल्ड आणि सागरी महामार्गाची उभारणी करणार, रखडलेल्या पाटबंधारे प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करणार, काजू आणि आंबा फळप्रक्रिया बोर्डसाठी दोन हजार कोटी देणार, आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघात मंडणगड येथे एमआयडीसी उभारणार, कोयनेचे वाहून जाणारे जल वापरात आणणार, अशा घोषणा झाल्या. मुख्यमंत्री बोलायचे थांबणार एवढ्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी योगेश कदमांवर बोलण्याची सूचना केली. त्यावर मुख्यमंत्री हसून म्हणाले, रामदासजी मी पहिल्यांदाच सांगितले आहे. योगेश कदम यांच्यामागे मी खंबीरपणे उभा आहे. त्यांचा पराभव करणारे जन्माला यायचे आहेत, असे सांगत रामदास कदमांना आश्वस्त केले. या दोन्ही सभांमध्ाून ठाकरे आणि शिंदे यांनी आपापल्या नेत्यांना बळ देण्याचे काम केले. आता पुढच्या लढाईसाठी दोन्ही बाजूकडून जोरदार तयारी सुरू आहे. येणारा काळ दोघांसाठीही कसोटीचा आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन आमदार तर एकनाथ शिंदे यांच्याकडे बारा आमदार आहेत. सध्याच्या राजकीय लढाईत रामदास कदम विरुद्ध भास्कर जाधव, योगेश कदम विरुद्ध संजय कदम, दीपक केसरकर विरुद्ध विनायक राऊत असे शाब्दिक रणयुद्ध तेजीत आहे. उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभ्ाूती आणि एकनाथ शिंदे यांचा विकासाचा अजेंडा यापैकी पसंती कुणाला हे मात्र येता काळ ठरवेल.