डोंबिवली एमआयडीसी भागातील दोन कंपन्यांना भीषण आग ;लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक  | पुढारी

डोंबिवली एमआयडीसी भागातील दोन कंपन्यांना भीषण आग ;लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक 

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली एमआयडीसीत कपड्यांच्या कंपनीत लागलेल्या आगीने मध्यरात्री रौद्र रूप धारण करत शेजारीच असणाऱ्या सुगंधी द्रव्याच्या कंपनीला वेढले आणि एकच गोंधळ उडाला. कारण कंपनी शेजारीच सिएनजी गॅस पंप आहे. तो जर पेटला तर डोंबिवलीत पुन्हा प्रोबेस स्फोटाच्या हृदयद्रावक आठवणी ताज्या होतील अशी भिती प्रत्येकाला वाटू लागली. क्षणार्धात अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आणि पाण्याचे 8 टँकर घटनास्थळी दाखल झाले आणि चार तासाच्या अथक परिश्रमाने पहाटे आग विझवण्यात यश आले आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

डोंबिवलीत एमआयडीसी फेज 1 परिसरात ही घटना घडली.आग लागल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखाप्रमुख सचिन जोशी यांनी घटनास्थळी धाव घेवून अग्निशमन दलास पाचारण केले. प्राज ही टेक्सटाइल कंपनी आणि रामसन्स ही सुगंधी द्रव्यांची कंपनी या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या शेजारी आहेत. बुधवारी रात्री 1 वाजता अचानक प्राज या टेक्सटाइल कंपनीला आग लागली ही आग वाढली आणि बाजूलाच असणाऱ्या रामसन्स कंपनी देखील या आगीच्या विळख्यात पडली. ही कंपनी सुगंधी द्रव्ये बनवणारी असल्याने कंपनीतील ज्वलनशील पदार्थांमुळे ही आग वाढली. मात्र या कंपनीला लागूनच सीएनजी पंप असल्याने आग लवकरात लवकर आटोक्यात आणणे गरजेचे होते. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी चार तास केवळ गॅस पंपावर पाण्याचा मारा करून ते गॅस मशीन थंड करण्याचे काम केले.

दरम्यान या दोन्ही कंपनीत 60 ते 70 चा आसपास कामगार काम करतात. मात्र रात्र असल्याने या कंपनीत कोणीही नव्हते. जर ही आग दिवसा लागली असती तर डोंबिवलीत पुन्हा प्रोबेस स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या असत्या. विशेष म्हणजे जोपर्यंत आग विझत नव्हती तोपर्यंत छोट्या छोट्या स्फोटांचे आवाज येत होते. यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी जीव मुठीत धरला होता.

खंबाळपाडा एमआयडीसी फेज १ मध्ये असणाऱ्या रामसन्स आणि प्राज या दोन कंपन्या आगीत जळून खाक झाल्या असून लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे या कंपन्यांना आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.या मध्ये जीवित हानी झाल्याची कोणतीही माहिती अजून समोर आलेली नसून मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे नुकसान झाले आहे.

Back to top button