डोंबिवली: कोपरखाडी येथे अवैध रेती उपास करणारी बोट ग्रामस्थांनी पकडली | पुढारी

डोंबिवली: कोपरखाडी येथे अवैध रेती उपास करणारी बोट ग्रामस्थांनी पकडली

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली कोपरगाव खाडी परिसरात बेकायदा वाळू उपसा करणारे बाज आणि बोट ग्रामस्थांनी शनिवारी रात्री पकडली. यावेळी रेती उपसा करणारे कामगार मात्र पळून जाण्यास यशस्वी झाले. कल्याणचे नायब तहसीलदार, स्थानिक पोलीस यांनी घटनास्थळी येत बोट पेटवून दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री रेती उपसा करणारे बाज आणि बोट कोपर खाडी किनारी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर येऊन अडकल्याचे तेथील ग्रामस्थांनी पाहिले. त्यानंतर ग्रामस्थांनी या संदर्भात विष्णूनगर पोलीस ठाणे, कल्याण तहसील आणि स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार सुषमा बांगर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत बेकायदा वाळू उपसा करणारी बोट पेटवून दिली. यात एक बाज आणि बोट असे एकूण १२ लाख किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, ही बोट नेमकी कोणाची आहे, याचा तपास करत असल्याचे नायब तहसीलदार सुषमा बांगर यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी देखील अनेक दिवसापासून खाडी किनाऱ्याजवळ रेती उपसा होत असल्याने खाडी किनाऱ्याजवळ असलेल्या जमिनीचे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली.

हेही वाचा 

Back to top button