ठाणे: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाची हत्या करण्याबाबत व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर ठाणे पालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. या गुन्ह्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा समावेश आहे. गुरूवारी चार जणांना अटक झाल्यानंतर आज (दि.१७) आमदार आव्हाड यांनी ठाणे न्यायालयात धाव घेतली. ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना काही अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दरम्यान चार जणांच्या पोलीस कोठडीत २० फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यासह ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आव्हाड यांच्या वकिलांनी अटक पूर्व जामीनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. सुनावणीनंतर काही अटी शर्थीवर आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला.
तर दुसरीकडे या गुन्ह्यातील ४ जणांना दिलासा न देता ठाणे न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. हेमंत वाणी यांच्यासह चौघांना एक दिवसाची कोठडी मिळाली होती. आज त्यांना जमीन मिळणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष असताना त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आरोपी अभिजीत पवार यांच्याकडे असलेले शस्त्र (बंदूक) पोलिसांनी हस्तगत न केल्याने पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
हेही वाचा